संसारात वजाबाकी तर परमार्थ केल्याने बेरीज होते – हभप संदीपान महाराज शिंदे

WhatsApp Image 2020 01 30 at 7.00.50 PM

फैजपूर, प्रतिनिधी | माणसाच्या जीवनात अनुकूलता व प्रतिकूलता असते कधी सुख तर कधी दुःख हे जीवनात येत असतात. जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत पूर्ण सुख किंवा पूर्ण दुःख मिळेल असे होत नाही.’ जे ज्याच्यात नाही ते त्याच्यात मिळतच नाही’ असा महत्वपूर्ण उपदेश परमपूज्य हभप संदीपान महाराज शिंदे यांनी दिला.

ज्याच्यात वजाबाकी होते तो संसार व ज्यात बेरीज होते तो परमार्थ. युवापिढीने संस्कारी बनले पाहिजे. संसारात राहून परमार्थ करावा असे परमपूज्य हभप संदीपान महाराज शिंदे यांनी सांगितले. फैजपूर येथे श्री खंडोबा देवस्थानाच्या प्रांगणात २७ कुंडी महाविष्णू याग महोत्सव गाथा पारायण व नाम संकीर्तन सप्ताह सुरू असून तिसऱ्या दिवशीच्या कीर्तनात महाराजांनी सांगितले. या कार्यक्रमास अमळनेरचे परमपूज्य प्रसाद महाराज तसेच वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ परमपूज्य हभप लक्ष्मण बाबा महाराज कोल्हे, हभप दुर्गादास महाराज, हभप सुखदेव उर्फ कन्हैया महाराज यांच्यासह वैकुंठवासी नथू सिंग बाबा दौरा मंडळ व सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी येथील गुणीजन गायक-वादक यांची उपस्थिती होती. दिनांक २७ जानेवारी ते ३ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या या कार्यक्रमास पंचक्रोशीतील शेकडो भाविकांची उपस्थिती लाभत आहे. दिनांक २९ जानेवारी ते २ फेब्रुवारी २० यादरम्यान दुपारी तीन ते पाच हभप चैतन्य महाराज देगलूरकर यांचे योगी पावन मनाचा मुक्ताई चिंतन तसेच ताटीचे अभंग यावर प्रवचन होईल. त्याचप्रमाणे आज पासून एक फेब्रुवारी पर्यंत दररोज सकाळी आठ ते एक यादरम्यान २७ कुंडी महाविष्णू याग यज्ञ होईल तसेच दररोज सकाळी ८ ते १२ या दरम्यान गाथा पारायण असे विविध महत्वपूर्ण कार्यक्रम होणार असून सकाळी ५ ते ६ काकडा आरती, ६ ते ७ विष्णुसहस्रनाम व संध्याकाळी ५ ते ६ हरिपाठ असा कार्यक्रमांचा खजिना भक्तांसाठी उपलब्ध आहे. आज संध्याकाळी ८-०० वाजता प्रसिद्ध किर्तनकार आचार्य अमृताश्रम स्वामी महाराज यांचे कीर्तन होणार आहे. भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजन समितीने केले आहे.

Protected Content