जळगाव, प्रतिनिधी । जळगाव आगारातील एसटी वाहक स्व. मनोज अनिल चौधरी यांच्यावर अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, अशी मागणी जळगाव विभागाच्या संयुक्त कृती समितीने विभाग नियंत्रक नियंत्रकांकडे केलेली आहे.
एसटी वाहक स्व. मनोज चौधरी यांच्यावर अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्याचा शोध घेण्यात यावा या मागणीसाठी नुकतीच संयुक्त कृती समितीची महत्त्वपूर्ण बैठक जळगाव आगारात घेण्यात आली. या बैठकीत स्वर्गीय मनोज चौधरी यांना न्याय मिळवण्यासाठी सर्व संघटनांनी आपली एकजूट दाखवली. श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर स्वर्गीय मनोज चौधरी यांच्यावर अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर ठोस कारवाई न झाल्यास संयुक्त कृती समितीच्या वतीने दिनांक ४ डिसेंबर २०२० पासून आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा संयुक्त कृती समितीच्या वतीने एसटी प्रशासनाला देण्यात आला.
संयुक्त कृती समिती सदस्य सुरेश चांगरे, नरेंद्र सिंग राजपूत, आर. के. पाटील, शैलेश नन्नवरे, विनोद शितोळे, गोपाळ पाटील, मनोहर मिस्त्री, मनोज सोनवणे यांच्यासह आगारातील शेकडो कर्मचाऱ्यांनी या महत्त्वपूर्ण बैठकीत भाग घेतला. त्याचप्रमाणे उपस्थित कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या विरोधात लिखित स्वरूपात तक्रार देखील दिली. काही अधिकाऱ्यांकडून नेहमीच एसटी कर्मचाऱ्यांना त्रास होत असल्याचे तसेच विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्याबाबत धमक्या मिळत असल्याने संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करून तात्काळ बदली करावी व अशा अधिकाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्यांवर देखील कडक कारवाई करावी अशी मागणी सर्व कर्मचाऱ्यांनी केली. बैठकीपूर्वी स्व. मनोज चौधरी यांच्या नातेवाईकांनी कृती समिती सदस्यांची भेट घेऊन न्याय मिळवून देण्यासाठी विनंती केली.
याप्रसंगी जळगाव आगाराचे आगार व्यवस्थापक प्रज्ञेश बोरसे व सह आगार व्यवस्थापक निलेश पाटील यांनी कृती समितीच्या वतीने दिलेले निवेदन स्वीकारले.