मुंबई (वृत्तसंस्था) लॉकडाऊनच्या काळात मदत करणाऱ्या परिवारातीलच दोन अल्पवयीन मुलींवर एका 80 वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. मुंबईतील कुर्ला पश्चिम भागातील व्हीबी नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही संतापजनक घटना घडली आहे.
या आरोपीचे कुटुंब हे मुळ उत्तर प्रदेश येथील रहिवासी आहे. लॉकडाउन लागू होण्याच्या आधीच त्याने आपल्या कुटुंबाला गावी पाठवून दिले होते. परंतु, लॉकडाउन लागू झाल्यानंतर त्याला आपल्या गावी जाता आले नाही. एकटाच राहत असल्यामुळे वयोवृद्ध असल्याचा विचार करून शेजारी राहणाऱ्या पीडितेच्या कुटुंबाने त्याला वेळोवेळी मदत केली. एकदा तक्रारदार पीडित कुटुंबातील 12 वर्ष आणि 7 वर्षाच्या या दोन मुली आरोपीला चहा, जेवण देण्यासाठी गेल्या. परंतू बराच वेळ झाला मुली बाहेर आल्या नव्हत्या. त्यावेळी शेजारीच राहणाऱ्या एका व्यक्तीने आरोपीच्या घरात डोकावून पाहिले तर संतापजनक प्रकार समोर आला आहे. त्यानंतर शेजाऱ्याने आरडाओरडा करून पीडितेच्या कुटुंबीयांना माहिती दिली. याप्रकरणी पीडित मुलींच्या आईने व्हीबी नगर पोलीस स्थानकात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी बाल संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.