संचारबंदी : मोहाडी जि. प. शाळेतर्फे व्हाट्सअॅपच्या माध्यमातून घरीच अभ्यास

जळगाव, प्रतिनिधी । कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन जाहीर केले असून त्यामुळे शाळा बंद व विद्यार्थ्यांच्या परीक्षा देखील रद्द झालेल्या आहेत. असे असले तरी या कालावधीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून जि. प. प्राथमिक शाळा मोहाडी येथील प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पालकांचा व्हाट्सअॅप मो. नं. मिळवून प्रत्येक वर्गाचा व्हाट्सअॅप गृप तयार करुन विद्यार्थ्यांना दररोज घरचा अभ्यास देण्यात येत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असली तरी मोहाडी येथील जि. प. प्राथमिक शाळेतर्फे विद्यार्थ्यांना व्हाट्सअॅप गृपच्या माध्यमातून शिक्षण दिले जात आहे. यासाठी मुख्याध्यापक गणेश बागुल, उपशिक्षिका उषा मंगळे , सुरेखा जोशी, भारती शिंपी, कांचन राणे, टिना सोनवणे, जयश्री पाटील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व घरी बसून अभ्यास करण्यास प्रेरित करीत आहेत. पालकांकडून सदर उपक्रमाचे कौतूक केले जात आहे. यासाठी डाएट जळगावच्या प्राचार्या , जळगाव पं.स.चे गटशिक्षणाधिकारी एस. एस. चौधरी, शि.वि.अ. आर.व्ही. बिर्‍हाडे , केंद्रप्रमुख डि. एन. ठाकूर यांचे मार्गदर्शन लाभत आहे. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना स्टडी फॉर्म होम करण्यासाठी दररोजच्या अभ्यासाची एक पोस्ट दिली जाते. ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी त्यादिवशी करावयाच्या अभ्यासाची माहिती असते. सदर पोस्ट व स्टडी फ्रॉम होमच्या सूचना विद्यार्थ्यांपर्यंत पोचवण्यासाठी व विद्यार्थ्यांना दररोजचा अभ्यास करण्यासाठी सर्व वर्ग शिक्षिका आपली जबाबदारी अत्यंत उत्कृष्टरित्या पार पाडतआहेत. विद्यार्थीही घरी पालकांसोबत बसून दिलेला अभ्यास पूर्ण करून व्हाट्सअॅप गृपवर केलेल्या अभ्यासाचा फोटो शिक्षकांना पाठवित आहेत.

Protected Content