जळगाव , प्रतिनिधी । जळगाव जिल्हा श्रीराम मंदिर निधी समर्पण समितीतर्फे 15 ते 31 जानेवारी 2021 दरम्यान शहरासह जिल्ह्यातील विविध भागांत उत्साहपूर्ण वातावरणात श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र निधी समर्पण अभियान राबविण्यात आले. त्यास नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यात दोन लाख 67 हजार कुटुंबांशी संपर्क झाला असून, सव्वादोन कोटींपेक्षा अधिक निधी समर्पण आतापर्यंत जमा झाले आहे.
जळगावातील विविध वस्त्यांत 10 जानेवारीस सडा-रांगोळी, दिवे, पालखी, ढोल-ताशे, मोटारसायकल रॅली काढण्यासह महिलांनी ‘राम जन्मला गं सखे राम जन्मला.. ते कुश लव रामायण गाती…’ अशा रामायणातील विविध प्रसंगांवर आधारित रांगोळी रेखाटली. पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील 200 गावांतून अभियानाला सुरूवात करण्यात आली. याप्रसंगी समाजातील विविध स्तरातील नागरिक स्वतःहून अभियानात सहभागी होत असल्याचे पाहावयास मिळाले.
शहरी भागात साधारणपणे पाच-सात कॉलन्यामिळून दहा हजार लोकसंख्येची वस्ती, तसेच ग्रामीण भागात आठ-दहा गावे मिळून एक मंडल व तीन-चार मंडल मिळून एक उपखंड अशी प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्यासाठी कार्यकर्त्यांची रचना करण्यात आली. या अभियानात खासदार रक्षा खडसे जळगाव, भुसावळमधील महिलांच्या एकत्रिकरणात सहभागी होत्या. उद्योजक, डॉक्टर, वकील, व्यापारी, प्राध्यापक, शिक्षक, व्यावसायिक अशा साधारण 25 श्रेणींमध्येही या निमित्ताने संपर्क सुरू असून, अतिशय उत्साहात नागरिक अभियानात सहभागी होत आहेत. 31 जानेवारी 2021 पर्यंत आलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील सर्व शहरी भागातील 203 वस्त्यांत तसेच ग्रामीण भागातील सुमारे 964 गावांत आतापर्यंत दोन लाख 67 हजार 880 घरांपर्यंत 8500 रामभक्तांद्वारे संपर्क झाला असून, सव्वादोन कोटींपेक्षा अधिक निधी समर्पण आतापर्यंत जमा झाले आहे.
या व्यापक अभियानाचे स्वरूप लक्षात घेऊन प्रभावी क्रियान्वयनासाठी जिल्ह्याचे जळगाव व भुसावळ असे दोन भाग केले आहेत. त्या अनुषंगाने सर्वांनी आपापल्या गावात व वस्त्यांत जाऊन निधी संकलनाच्या अभियानात सहभाग नोंदवावा, असे आवाहन श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र जळगाव जिल्हा समितीने केले आहे.