जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील भादली रेल्वेस्टेशन जवळील शेतात इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत साडेचार लाखांचा गुरांचा चारा जळून खाक झाला आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे राहणाऱ्या महिला शेतकरी प्रीती विलास महाजन यांचे जळगाव तालुक्यातील भादली रेल्वेस्टेशन जवळ शेत गट नंबर ७०८/२ मध्ये शेत आहे. या शेतात त्यांनी गुरांना लागणारा चारा व ज्वारीच्या पेंढ्या रचून ठेवलेल्या होत्या. दरम्यान त्यांच्या शेतावरून महावितरण कंपनीची विद्युत तारा गेलेल्या आहेत. दरम्यान या विद्युततारांमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे शेतातील चाऱ्याला आग लागले. याआगीत जवळपास साडेचार लाख रुपये किमतीचा गुरांचा चारा जळून खाक झाला आहे. या संदर्भात शेतकरी महिला प्रीती विलास महाजन यांनी नशिराबाद पोलीस ठाण्यात धाव घेऊन माहिती दिली. त्यांनी दिलेल्या खबरीवरून नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल सरला देवर करीत आहे.