सुनील धोंडगे यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासन व गणपती हॉस्पिटल, जळगाव या डेडीकेटेड हॉस्पिटलमधील आस्थपना यांच्याशी समन्वय साधण्यासाठी नोडल अधिकारी म्हणून जळगाव जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख सुनील धोंडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नोडल अधिकारी यांना सहाय्य करण्यासाठी नायब तहसीलदार हेमंत पाटील व श्रीकांत माटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

 

कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपलब्ध असलेली आयसीयू बेडची क्षमता अपुरी पडण्याची शक्यता आहे. याकरीता 13 मे, 2020 रोजीच्या आदेशान्वये गणपती हॉस्पिटल, आकाशवाणी चौक हे हॉस्पिटल अत्यावश्यक बाब म्हणून डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. नोडल अधिकारी व त्यांचे सहाय्यक यांनी गणपती हॉस्पिटल येथे प्रत्यक्ष डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल म्हणून काम सुरू करण्याअगोदर हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेल्या आयसीयू व्यवस्था, ऑक्सीजन साठा, वीज मीटर्स रीडिंग, बेड संख्या व इतर अनुषंगिक उपलब्ध असलेले सर्व वैद्यकीय उपकरण, सामग्री व साठा यांचे व्हिडिओ शूटिंग करण्यात यावे तसेच सर्व उपलब्ध साधनसामग्री, साठा यांची स्वतंत्र नोंद ठेवावी .

 

नोडल अधिकारी व त्यांचे सहाय्यक यांनी गणपती हॉस्पिटल, जळगाव या हॉस्पिटलच्या आस्थापनेशी समन्वय साधणे. वेळोवेळी सर्व वैद्यकीय साधनसामग्री, उपकरणे यांची उपलब्धता व आवश्यकता याबाबत सविस्तर नोंद ठेवावी, तसेच हॉस्पिटलच्या बाबतीत उद्भवणाऱ्या सर्व प्रशासकीय अडीअडचणी सोडण्याबाबत सर्व संबंधिततांशी समन्वय साधून आवश्यक ती कार्यवाही करावी व त्याबाबतचा अहवाल वेळोवेळी जिल्हाधिकारी यांना सादर करावे.  या आदेशाचे उल्लंघन अथवा भंग केल्यास सदर बाब ही आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम, 1897 भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र राहील. असे डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव यांनी आदेश निर्गमित केले आहे.

Protected Content