जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेतातील विद्युत तारांच्या शार्टसर्कीटमुळे लागलेल्या आगीत २ हेक्टर मधील सुमारे साडे सहा लाखाचा उस जळून खाक झाल्याची घटना नशिराबाद शिवारात घडली आहे. याबाबत नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मीक आगीची नोंद करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दीपक अशोक नारखेडे (वय-३३) रा. खालची अळी, नशिराबाद यांचे नशिराबाद शिवारात शेत गट नंबर १५२/१ मध्ये २ हेक्टर ११ आर शेत आहे. या शेतात त्यांनी उसाची लागवड केलेली आहे. दरम्यान मंगळवार १२ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास शेतातून गेलेल्या महावितरण कंपनीच्या विद्युत ताऱ्यांमध्ये शॉर्टसर्कीट झाल्याने शेतातील उसाला लागली. या आगीत ऊस पूर्णपणे जळून खाक झाला आहे. यामध्ये शेतकरी दीपक नारखेडे यांचे ६ लाख ३० हजार रूपयांचा ऊस आणि २० हजार रुपये किमतीचे पाईप असे एकूण साडेसहा लाख रुपये किंमतीचे नुकसान झाले आहे. या संदर्भात दीपक नारखेडे यांनी नशिराबाद येथे दिलेल्या खबरी वरून अकस्मात आगीची नोंद करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र ठाकरे करीत आहे.