चोपडा प्रतिनिधी । तालुक्यातील घुमावल बुद्रुक शिवारातील गोरगांवले रस्त्यालगत दोन एकर कापुन काढणीवर आलेला मका महावितरणच्या विजतारांच्या शॉकसर्किट मुळे जळून खाक झाला आहे. प्रशासनाकडून पंचनामा करण्यात आला.
गोरगांवले बुद्रुक येथील शेतकरी गोपाल झिपरू पाटिल व संजय बाजीराव पाटिल हे दोन्ही चुलतभाऊ आहेत.त्यांच्या शेतातील मका पिकाची कापणी व कणिस खुळणी झालेली होती.उद्या मका काढणार तोच काल दुपारी शेतातील महावितरणच्या विजतारांचा एकमेकांना स्पर्श झाल्याने आधीच कडक उन्हात कापुन पडलेला मका कडबा व कणीस यांच्यावर विजेचा गुल पडल्याने दोन एकर शेतातील मका पिकाचे जळुन नुकसान झालेले आहे.
याबाबत गोरगांवले सर्कल अधिकारी, तलाठी, कोतवाल, महावितरणचे अधिकारी, कर्मचारी यांनी शेतात जाऊन रितसर १०० टक्के नुकसानीचा पंचनामा केलेला आहे. तसा अहवाल चोपडा तहसिल कार्यालय व पोलीस स्टेशन यांचेकडे पाठविण्यात आलेला आहे, अशी माहिती नुकसानग्रस्त शेतकरी स्वप्निल गोपाल पाटिल यांनी दिलेली आहे. संबंधित शेतकऱ्यांना त्वरीत १०० टक्के नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी गोरगांवलेचे माजी सरपंच जगन्नाथ बाविस्कर यांनी केली आहे.