नवी दिल्ली : वृत्तसंस्था । दिल्लीमधील जेएनयूची माजी विद्यार्थी नेता शेहला रशीद यांच्यावर त्यांच्याच वडिलांनी गंभीर आरोप करत ती देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याचे म्हटले आहे. तसे पत्र शोरा यांनी जम्मू-काश्मीरच्या पोलीस महासंचालकांना पाठवले आहे.
शेहला यांचे वडील अब्दुल रशिद शोरा यांनी आपल्या मुलीचा देशाविरोधी कारवायांमध्ये सहभाग असल्याचा दावा केला आहे. शेहलापासून आपल्या जीवाला धोका असल्याचेही शोरा यांनी म्हटले आहे.
आपली पत्नी जुबैदा, मोठी मुलगी आसमा रशीद आणि पोलीस खात्यामधील एक कर्मचारीही शेहलासोबत या देशविरोधी कृत्यांमध्ये सहभागी असल्याचा आरोप या पत्रामध्ये शोरा यांनी केला आहे. जम्मू काश्मीर पीपल्स मुव्हमेंट पक्षामध्ये सहभागी होण्यापूर्वी शेहलाने एका उद्योजकांकडून तीन कोटी घेतल्याचा दावाही शोरा यांनी केला आहे. आपल्या जीवाला धोका असून आपल्याला सुरक्षा देण्यात यावी अशा विषयासंदर्भातील तीन पाणी पत्र शोरा यांनी जम्मू-काश्मीरच्या डीजीपींना पाठवले आहे. यामध्ये त्यांनी शेहलावर गंभीर आरोप करतानाच आपल्या जीवाला धोका असल्याने सुरक्षा पुरवण्यात यावी अशी मागणी केली आहे.