शेतात जाण्यासाठी कर्जावर हेलिकॉप्टर व परवानाही द्या !

 

 

भोपाळ : वृत्तसंस्था | मध्य प्रदेशमधील शेतकरी महिलेने चक्क हेलिकॉप्टर खरेदी करण्यासाठी कर्ज देण्याची तसेच ते चालवण्यासाठी परवाना देण्याची मागणी थेट राष्ट्रपतींकडे केलीय. सध्या सोशल नेटवर्किंगवर या महिलेने केलेल्या मागणीची चांगलीच चर्चा आहे.

मध्य प्रदेशमधील मंदासौर जिल्ह्यामधील बसंतीबाई लोहार नावाच्या महिलेने राष्ट्रपतींना पत्र लिहिलं आहे. या महिलेला गावातील काही गुंड त्रास देत असून ते तिला तिच्या शेतातही जाऊ देत नाहीत. या गावगुंडांनी माहिलेच्या मालकीच्या शेतात जाण्याचा रस्ता बंद केला आहे. हा रस्ता सुरु करण्यात यावा म्हणून मागील बऱ्याच काळापासून ही माहिला सरकारी कार्यालये आणि अधिकाऱ्यांकडे खेटे घालत आहे. मात्र अनेकदा सरकारी कार्यलयांच्या पायऱ्या झिजवूनही तिच्या हाती काहीच लालेली नाही. त्यामुळेच या सरकारी अनास्थेला कंटाळलेल्या बसंतीबाई यांनी थेट देशातील सर्वोच्च पदावर असणाऱ्या राष्ट्रपतींनाच पत्र लिहिलं आहे.

बसंतीबाई यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना लिहिलेल्या पत्रामध्ये गावातील गावगुंड आपल्याला कशाप्रकारे त्रास देतात याची व्यथा मांडलीय. “माझी ०.४१ हेक्टर जमीन आहे. या जमिनीच्या जीवावरच मी संसाराचा गाडा हाकते. मात्र मागील अनेक दिवसांपासून या शेतात जाण्याचा रस्ता गावातील गुंड परमानंद पाटीदार आणि त्याचा मुलगा लवकुश पाटीदारने बंद केलाय. शेतात जाणाऱ्या रस्त्यात मोठा खड्डा खोदण्यात आला असून त्यामुळे आता शेतात जाता येत नाही. मला आता शेती करण्यातही अडचणी येत आहे. शेतात जाणारा रस्ता तयार करण्याची मागणीसाठी मी अनेकदा सरकारी कार्यालयांमध्यें जाऊन आले. तिथं कोणीही माझी तक्रार ऐकून घ्यायला तयार नाही. त्यामुळेच मला माझ्या शेतात जाण्यासाठी एक हेलिकॉप्टर खरेदी करायला कर्ज आणि ते चालवण्यासाठी परवाना द्यावं,” असं या माहिलेने पत्रात म्हटलं आहे.

जिल्हाधिकारी मनोज पुष्प यांनी प्रकरण जिल्हा विशेषाधिकारी आणि तहसीलदारांकडे सोपवण्यात आल्याचं सांगितलं. बसंतीबाईंच्या शेतात जाणारा दुसरा एक रस्ता असून त्याचा वाद सुरु असल्याचं पुष्प म्हणाले. हा वाद लवकरच सुटेल अशी अपेक्षाही पुष्प यांनी व्यक्त केली.आता नायाब तहसीलदार सविता राठोड यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलीय. राठोड यांनी घटनास्थळी जाऊन पहाणी करावी आणि अहवाल सादर करावा असे आदेश देण्यात आलेत.

Protected Content