पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत सन २०२२ मधील पिक विम्याची रक्कम मिळाली नाही. यासाठी गुरूवारी ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता शेतकरी सेनेच्या वतीने आक्रमक भूमिका घेत शेकऱ्यांना पिक विम्याची रक्कम तातडीने अदा करावी या मागणीसाठी पाचोरा तहसील कार्यालयात बैठक घेण्यात आली.
सन – २०२२ मधील खरीप हंगामात पाचोरा तालुक्यातील १४ हजार शेतकऱ्यांनी नैसर्गिक आपत्ती पासुन सावरण्यासाठी अॅग्रीकल इन्शुरन्स कंपनीकडे पिक विमा काढला होता. दरम्यान याच वर्षी नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हेरावुन घेतला होता. तालुक्यातील शेतकरी सेनेने पुढाकर घेवुन कृषी विभाग व महसुल विभागास तात्काळ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतांचे पंचनामे करण्यासंदर्भात जागृत केले होते. नुकसानीचे पंचनामे करून अहवाल राज्य शासनाकडे पाठविण्यात येवुन केंद्र शासन व राज्य शासनाने विमा कंपनीला नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या विम्याची रक्कम देण्यासाठी आदेशीत केले असतांना देखील विमा कंपनीने ठराविकच शेतकऱ्यांना विमा रक्कम अदा केली असुन उर्वरित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा मोबदला मिळावा या मागणीसाठी गुरूवार ९ फेब्रुवारी रोजी पाचोरा तहसिलदार यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव, नायब तहसिलदार संभाजी पाटील, विमा कंपनीचे जळगांव विभागाचे उपप्रबंधक मिलिंद अहिरे, शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख अरुण पाटील, शेतकरी सेनेचे तालुका प्रमुख रमेश बाफना, एस. टी. कामगार सेना तालुका प्रमुख अजय पाटील, प्रगतशील शेतकरी ईश्वर देशमुख, विमा कंपनीचे तालुका प्रतिनिधी समाधान मोरे उपस्थित होते. या बैठकीत अरुण पाटील व रमेश बाफना यांनी विमा प्रतिनिधींना चांगलेच धारेवर धरले होते. बैठकी अंती तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव व विमा कंपनीचे उपप्रबंधक मिलिंद अहिरे यांनी अहवाल वरिष्ठांना पाठविणार असल्याचे सांगितले.