इंदापूर (पुणे) : वृत्तसंस्था । शेतकऱ्यांना व सामान्यांना लुबाडणारे लॉकडाऊन शासनाने जाहीर करू नये, अशी भूमिका शेतकरी सुकाणू समितीने घेतली आहे.
कोरोनाचा संसर्ग असला तरी तो रोखण्यासाठी लॉकडाऊनपेक्षा सरकारने वेगळी उपाय योजना करावी, असं म्हणणं शेतकरी सुकाणू समितीने मांडल आहे.
मागील लॉकडाऊन आणि अतिवृष्टीतून शेतकरी सावरत असताना सध्याच्या लॉकडाऊनच्या नुसत्या चर्चेने शेतमालाचे भाव ढासळत आहेत. पोल्ट्री उत्पादकांचे आधीच कंबरडे मोडले आहे आणि तरीही वीज बिल वसुलीचा धडाका सुरुच आहे. आता लॉकडाऊन लावून शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देऊ नका, अशी मागणी समितीने केली आहे.
लॉकडाऊनच्या चर्चांनी आता दूध दर ढासळू लागला आहे. लॉकडाऊन झाला तर शेतमजूर, हातावरचे पोट असणाऱ्याचे हाल होतील आणि सर्वाधिकार मिळाल्यामुळे प्रशासन खुश होईल. एक लाभार्थी वर्ग लॉकडाउनचा चाहता आहे, ज्यांनी नफा कमावला काळाबाजार केला… आणि दुसरा लॉकडाऊनमुळे लेकरा-बाळासोबत अनवाणी उपाशी चालला त्यामुळे लॉकडाऊन नको, असं शेतकरी सुकाणू समिती पुणे जिल्हा अध्यक्ष श्रीकांत करे यांनी सांगितलं.
आमची या सरकारला हात जोडून विनंती आहे की राज्यातील सामान्यांचा आणि शेतकऱ्यांचा विचार करता सरकारने लॉकडाऊनशिवाय दुसरं कोणताही निर्णय घ्यावा पण लॉकडाऊन मात्र जाहीर करु नये, असं श्रीकांत करे म्हणाले.
दुसरीकडे राज्यातील कोरोना संसर्गाची स्थिती दिवसेंदिवस चिंताग्रस्त बनत चालली आहे. राज्यांतल्या अनेक शहरांत कोरोनाचे अधिकाधिक संख्येने रुग्ण मिळू लागले आहेत. त्यामुळे काही शहरांत संचारबंदीच्या घोषणा केल्या गेल्या आहेत तर काही भागांत कडक निर्बंध लादले गेले आहेत. त्यामुळे सामान्य लोकांमध्ये लॉकडाऊनची चर्चा रंगू लागली आहे.