वॉशिंग्टन: वृत्तसंस्था । अमेरिकेतील खासदारांनी पराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ यांना पत्र लिहीले आहे. अमेरिकेने या आंदोलनाचा मुद्दा भारतासमोर उपस्थित करण्याची मागणी केली आहे.
मागील महिनाभरापासून भारतातील नव्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचे पडसाद जागतिक पातळीवर उमटण्यास सुरुवात झाली आहे.
भारतीय वंशाच्या खासदार प्रमिला जयपाल यांच्यासह सात खासदारांनी हे पत्र लिहीले आहे. माइक पॉम्पिओ यांना २३ डिसेंबर रोजी लिहीलेल्या पत्रात त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. या आंदोलनात पंजाबमधील शेतकरी मोठ्या प्रमाणावर उतरले आहेत. पंजाबशी निगडीत असल्यामुळे अनेक अमेरिकन शीख नागरिकांच्या मनात चिंता निर्माण झाली आहे. त्याशिवाय इतर भारतीय वंशाच्या नागरिकांमध्ये या आंदोलनामुळे चिंतेचे वातावरण असल्याचे पत्रात म्हटले गेले आहे.
भारतीय वंशाच्या नागरिकांवर या आंदोलनाचा परिणाम होत आहे. अनेकांचे कुटुंबीय, मूळ भूमी पंजाबमधील आहे. त्यामुळे आपले कुटुंबीय, नातेवाईकांची चिंता अमेरिकन-भारतीयांना सतावत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. राजकीय अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य असावे यासाठी अमेरिका प्रयत्नशील असल्याचे सांगत भारतीय परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा करण्याची मागणी अमेरिकन खासदारांनी माइक पॉम्पिओ यांच्याकडे केली आहे.
भारत सरकारला आपल्या देशाच्या हितांच्या अनुषंगाने धोरण आखण्याचा अधिकार असून त्याचा आम्ही आदर करत आहोत. मात्र,परदेशात असलेल्या नागरिकांच्या अधिकारांना आम्ही मानत असून त्यांच्याकडून कृषी कायद्यांना विरोध केला जात आहे. हा कृषी कायदा घातक असल्याचा दावा करत भारतीय शेतकरी आंदोलन करत असल्याचे पत्रात नमदू करण्यात आले आहे. भारतीय वंशाच्या अमेरिकन खासदार प्रमिला जयपाल, डोनाल्ड नोरक्रॉस, ब्रेनडॉन एफ. बॉयल, ब्रायन फिट्जपॅट्रिक, मेरी गे स्कानलोन, डेबी डिंगेल आणि डेविड ट्रोन यांनी या पत्रावर स्वाक्षरी केली आहे.
याआधीदेखील अमेरिकेतील काही खासदारांनी शेतकरी आंदोलनाच्या बाजूने भूमिका घेत पोलिसांनी केलेल्या कारवाईचा निषेध केला होता. त्याशिवाय कॅनडा, ब्रिटनमधील खासदारांनी भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता.