शेंदूर्णी, प्रतिनिधी | येथील नगरपंचायतने वतीने शेंदूर्णी नगरपंचायत हद्दीतील ४० हजार नागरिकांची ताप, पल्स आणि ऑक्सिजन तपासणी करण्यात येणार आहे. आज नगरपंचायत कार्यालयात आयोजित बैठकीत आशा सेविकांना साहित्य देऊन मार्गदर्शन करण्यात आले.
नगरपंचायत मुख्याधिकारी साजिद पिंजारी, गोविंदभाई अग्रवाल येथिल प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी राहुल निकम यांनी कोरोना रुग्णांना जाणवणारी लक्षणे, ताप तपासणी कशी करावी याविषयी आशा सेविकांना व नगरपंचायत कर्मचारी यांना माहीती दिली. कोरोना सदृश लक्षणे आढळून येणाऱ्या रुग्णांना पहुर येथिल कोविड १९ सुरक्षा केंद्रात भरती करण्यासाठी सूचनाही दिल्या. यावेळी प्रत्येकी २ आशा सेविका व एक नगरपंचायत कर्मचारी मिळून १ गट याप्रमाणे २४ कर्मचाऱ्यांचे ८ गट तयार करण्यात आले आहेत. त्यांच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी २ वरीष्ठ कर्मचारी नेमण्यात आले आहे. हे आठ गट दररोज प्रत्येकी १ हजार नागरिकांना तपासणार आहेत. त्यामुळे आठ गटाद्वारे दररोज ८ हजार नागरिकांची तपासणी करून ५ दिवसात संपूर्ण ४० हजार नागरिकांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचे मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांनी सांगितले आहे. दररोजच्या कामाचे देखरेख व मूल्यमापन करण्यासाठी नगरपंचायततर्फे पाणीपुरवठा अभियंता काझी यांच्याकडे स्वतंत्र जबाबदारी देण्यात आली आहे. शेंदूर्णी नगरपंचायत हद्दीत आतापर्यंत नगरपंचायतकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनामुळे एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही. यापुढेही कोरोना शिरकाव होऊ नये म्हणून नागरिकांची तपासणी करण्यात येत असून त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. नगरपंचायत हद्दीतील नागरिकांचे सुरक्षेसाठी केंद्र व राज्य सरकारच्या निर्देशाचे पूर्ण पालन करण्यात येत असल्याचे गोविंदभाई अग्रवाल यांनी यावेळी सांगितले. नगरपंचायत मुख्याधिकारी साजिद पिंजारी हे नागरिकांचे आरोग्य सुरक्षेविषयी कुठल्याही प्रकार तडजोड न स्वीकारता त्यांनी नगरपंचायत मार्फत तापमापक यंत्र, पल्स व ऑक्सिजन तपासणी मिटर उपलब्ध करून दिल्यामुळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आशा सेविका व नगरपंचायत कर्मचारी यांच्याद्वारे नागरिकांची तपासणी करून त्यांना सुरक्षितता प्रदान करणे शक्य होणार आहे.