शेंदूर्णी, प्रतिनिधी । येथील सीसीआय कापूस खरेदी केंद्रात साठवणुकीसाठी जागा नसल्याचे कारण देऊन बंद करण्यात आले होते. त्यातच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढून दोन महिन्यापासून संचारबंदी लागू असल्याने शेतकरी कापसाची विक्री करू शकलेला नाही. यामुळे सीसीआय कापूस खरेदी केंद्र त्वरीत सुरु करण्यात यावी अशी मागणीनंतर आज ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात आल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
कोरोना संचारबंदी लागू असल्याने गेल्या २ महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या घरात पांढरे सोने म्हणजेच कापूस पडून आहे. मे महिना उजाडला तरी कापूस विकला जात नाही म्हणून शेतकऱ्यांना शेतीची खरीप पूर्व मशागत करण्यासाठी तसेच खरिपात पेरणीसाठी बियाणे, खते विकत घेण्यासाठी पैसे उपलब्ध नाही. घरात असलेल्या शेत मालाला खरीददार उपलब्ध नाही म्हणून शेतकरी चिंतेत सापडला आहे. अश्या परिस्थितीत सीसीआय कापूस खरेदी केंद्र सुरू झाल्यास शेतकऱ्यांची चिंता मिटू शकते म्हणून कापूस खरेदी सुरू करावी व ऑनलाईन नोंदणी करावी म्हणून काल जामनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांनी धडक दिली होती. तेव्हा शेंदूर्णी व परिसरातील शेतकऱ्यांनी जामनेर बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या शेंदूर्णी उपबाजार आवार कार्यालयात कापूस नोंदणी करण्यासाठी अर्ज करावा असे बाजार समिती सभापती संजय देशमुख व सचिव प्रसाद पाटील यांनी सांगितले होते. त्यांच्या आवाहनानुसार आज सकाळी ९ वाजेपासून सीसीआय कापूस खरेदी केंद्र त्वरीत सुरू करण्यात यावे कापूस विक्रेत्या शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्यात यावी या मागणीसाठी शेंदूर्णी परिसरातील शेतकऱ्यांनी शेंदूर्णी बाजार समितीचे गेट समोर एकच गर्दी केली होती. आज नोंदणी अर्ज स्वीकारण्यात आल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.