शेंदुर्णीकरांना दिलासा : मालमत्ता कर वाढीस स्थगिती

शेंदुर्णी – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  शेंदुर्णी नगर पंचायतची मालमत्ता कर वाढीस स्थगिती दिली असून प्रारूप विकास आराखड्यातून खाजगी शेतजमिनी वगळण्याचा ठराव संमत करण्यात आला असल्याची माहिती मुख्याधिकारी साजीद पिंजारी यांनी  पत्रकार परिषदेत दिली.

 

 

शेंदुर्णी नगर पंचायतने २०२३ ते २०२६ करिता प्रस्तावित करवाढ व मालमत्ता क्षेत्र सुधारणा करण्यासाठी मालमत्ताधारक नागरिकांना नोटीसा बजावल्या होत्या. तसेच पुढील २० वर्षांकरिता प्रस्तावित प्रारूप विकास आराखडा जाहीर करण्यात आला होता. मालमत्ता करवाढी विरुद्ध नागरिकांना हरकती घेण्यासाठी ८/११/२०२२ तर प्रस्तावित प्रारूप विकास आराखड्या हरकती घेण्यासाठी १३/११/२०२२ मुदत देण्यात आली होती.  प्रस्तावित करवाढ व प्रारूप विकास आराखड्या विषयी व्यापारी, शेतकरी व सर्व सामान्य नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे. प्रस्तावीत करवाढ व प्रारूप विकास आराखडा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी शेंदुर्णी शहर व्यापारी असोसिएशन व नागरिकांनी ३१ ऑक्टोबर रोजी तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नागरिकांचा २ नोव्हेंबर रोजी नगर पंचायतवर मोर्चा काढण्यात आला होता. शेंदुर्णी शहरातील प्रस्तावित मालमत्ता करवाढ व प्रारूप विकास आराखड्या विरुद्ध असलेल्या तीव्र जन भावनांचा विचार करता शेंदुर्णी नगर पंचायतचे ३१ ऑक्टोबरच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नगरसेवकांनी मालमत्ता करवाढीच्या विषयाला एकमुखाने ठराव संमत करून कर वाढीस स्थगिती देण्यात आली असल्याचे मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. याप्रसंगी नगराध्यक्षा विजया खलसे, उपनगराध्यक्ष निलेश थोरात, नगरसेवक शाम गुजर, शरद बारी, गणेश पाटील, गणेश जोहरे व उपस्थित भाजप नेते अमृत खलसे, गोविंद अग्रवाल, प्रकाश झंवर, नारायण गुजर, सुनील शिनकर, राजेंद्र गुजर, कडोबा सुर्यवंशी, इमाम शेख उपस्थित होते.  तसेच मालमत्ता क्षेत्र, मालमत्ताधारकांचे नावात दुरुस्ती या हरकती घेण्यासाठी दिनांक ८ डिसेंबर २०२२ पर्यंत मुदत वाढ देण्यात आली असल्याचे  मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांनी स्पष्ट केले.

 

Protected Content