मोठी बातमी : मविआकडून रावेरमधून एकनाथ खडसे उतरणार रिंगणात ?

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आगामी लोकसभा निवडणुकीसाठी माजी मंत्री तथा शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे यांना रावेरमधून संधी मिळू शकते अशी माहिती समोर आली असून त्यांचे नाव शॉर्टलिस्टमध्ये आले आहे.

महाविकास आघाडीतील जागा वाटपाची चर्चा अजून पूर्णत्वाला आली नसतांना काही संभाव्य उमेदवारांची यादी एबीपी-माझा या वाहिनीने जाहीर केली आहे. यात रावेर लोकसभा मतदारसंघातून माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांना संधी मिळणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

एकनाथ खडसे यांनी आधीच आपण लोकसभा लढविण्यासाठी सज्ज असल्याचे सांगितले असले तरी यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणार असल्याचे नमूद केले होते. तर, मध्यंतरी त्यांना महसूल खात्याने गौणखनिज प्रकरणी दंड ठोठावला असल्याने ते निवडणूक लढविणार की नाही ? याबाबत संशयकल्लोळ निर्माण झाला असतांनाच त्यांचे नाव शॉर्ट लिस्टमध्ये आलेले आहे.

तर, दुसरीकडे जळगाव लोकसभा मतदारसंघातून पक्षाचे जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने यांना तिकिट मिळणार असल्याचा दावा या वृत्तात करण्यात आलेला आहे. आधी यासाठी जळगावचे माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांचे नाव आघाडीवर होते. मात्र एबीपी-माझाच्या यादीत डॉ. माने यांना संधी मिळणार असल्याचे समजते.

या वृत्तात जाहीर केलेली यादी ही संभाव्य या स्वरूपातील असून यात ऐन वेळेस बदल होण्याची शक्यता आहे.

Protected Content