अमरावती | आगामी निवडणुकीत शिवसेनेला जबर फटका बसणार असून ही हानी टाळत पक्ष टिकवायचा असेल तर त्यांनी भाजपसोबत युती करावी असा सल्ला आज केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे. ते आज येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.
रिपब्लिकन नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आज अमरावतीत होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शिवसेनेने भाजपसोबत युती करावी असं आवाहन त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केलं. जर शिवसेना टिकवायची असेल तर शिवसेनेने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी सोबतची युती तोडावी. नाहीतर शिवसेनेचं २०२४ मध्ये खूप मोठं नुकसान होईल. या सरकारमध्ये नेहमी भांडण होत असतात. त्यामुळे हे सरकार जास्त काळ टिकू शकणार असा दावा त्यांनी केला आहे.
यावेळी त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यावर घणाघाती टीका केली. वंचितकडून मतं खाण्याचं राजकारण होत आहे. युती केल्याशिवाय कठीण आहे, असं ते म्हणाले. तर, आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास जातीला आरक्षण देण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारला देण्याबाबतचे १२७ वे संविधान संशोधन विधेयक राज्यसभेत मंजूर झाले. या विधेयकाला आठवलेंनी पाठिंबा दिला.