शिरसोली जकात नाक्याजवळून एकाची दुचाकी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शिरसोली जकात नाक्याजवळील एल.एच.शाळेसमोरून तरूणाची १० हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी गुरूवार १५ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, तौफिक खलील शेख (वय-३१) रा. दत्त नगर, मेहरूण हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. १२ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास शिरसोली जकात नाक्याजवळील एल.एच.शाळेजवळ कामानिमित्त दुचाकी (एमएच १९ बीएच ७२२८) ने आलेला होता. त्यावेळी दुचाकी शाळेच्या समेार पार्किंगला लावलेली होती. अज्ञात चोरट्यांनी पार्किंगला लावलेली १० हजार रूपये‍ किंमतीची दुचाकी चोरून नेल्याचे समोर आले. तरूणाने दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी कुठेही मिळून आली नाही. अखेर गुरूवारी १५ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक गणेश शिरसाळे करीत आहे.

Protected Content