शिरसोली गावनजीक बिबट्याचे दर्शन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील शिरसोली गावानजीकच्या परिसरातील शेतात शनिवारी रात्री बिबट्याचे दर्शन झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन्यजीव विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी यांनी केले आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील शिरसोली गावात राहणारे शेतकरी प्रभाकर शिंदे आंबटकर व त्यांचा मुलगा हे शनिवारी १८ मार्च रोजी रात्री ९ वाजेनंतर त्यांच्या शेतात पिकांना पाणी देण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना रस्त्याने एक बिबट्या जाताना दिसून आला, या घटनेमुळे दोघेजण भयभीत झाले होते. त्यांनी तातडीने गावात येऊन घटनेची माहिती दिली. पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी यांनी तातडीने  वन विभागाला फोन लावून घटनेची माहिती दिली. या घटनेमुळे शिरसोली गाव व परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी आठवड्यापूर्वी बेळी येथे एका बिबट्याने २ शेळ्यांचा पडशा पडला होता. हाच तो बिबट्या शिरसोलीच्या शेतामध्ये फिरत असल्याची शंका शेतकऱ्यांनी केली आहे. त्यामुळे रात्री शेतात जाण्यासाठी शेतकरी घाबरत आहे. वनविभागाने याची दखल घेत तातडीने बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी यांनी केली आहे.

Protected Content