शिक्षणात योग विषय समावेश करण्यासाठी योग शिक्षक महासंघातर्फे निवेदन

जळगाव प्रतिनिधी । नवीन शिक्षण नीती धोरणात योग विषयाचा समावेश, शालांत तसेच उच्च माध्यमिक शाळेमध्ये प्रमुख विषयामध्ये योगास स्थान देणे, महाविद्यालयात योग विषय अनिवार्य करणे, मनपा तसेच जिल्हापरिषद शाळेत योग विषयाचा समावेश, युजीसी मान्यताप्राप्त अस्थापना मधून प्रशिक्षित योग शिक्षकांना प्राधान्य देणे आदी प्रमुख मागण्यांचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, जळगाव मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी आणि महापौर भारती सोनवणे यांना देण्यात आले.

अनादी काळापासून योग हा प्रत्येक भारतीयाचा जिव्हाळ्याचा विषय राहिला आहे. गुरु शिष्य परंपरेत आश्रम व्यवस्थेत योग हा प्रमुख विषय होता तर साधकांची दिनचर्या ही योगमयच होती. मात्र परकीय आक्रमणानंतर आपल्या मूळ शिक्षण व्यवस्थेवर अनेक आघात करण्यात आले. त्याचाच परिणाम म्हणून मागील ३५० वर्षात आपल्या शिक्षण प्रणालीतून योग विषय हद्दपार झाला आहे.

नुकतेच अखिल भारतीय योग शिक्षक महासंघाच्या जळगाव शाखेचा शुभारंभ झाला. त्यानंतर महासंघाच्या वतीने योग शास्त्राच्या प्रचाराची मोहीच सुरु केलेली आहे. गुरु मुखातून प्रकट ज्ञानाला पुन्हा शिक्षणाचा दर्जा देण्यासाठी योग महासंघाच्या वतीने जळगाव जिल्ह्यातील प्रमुख धोरणकर्त्यांना वरील मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे.

भारतीय योग शिक्षक महासंघातर्फे अशा स्वरूपाची मागणी संपूर्ण भारतभर सुरु आहे. या मागणीसाठी सर्व लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, पंतप्रधान, केंद्रीय शिक्षणमंत्री यांना निवेदन देण्याचे कार्य सुरु आहे. याबाबत योग शिक्षकांच्या समस्यांना व्यासपीठ देण्यासाठी अखिल भारतीय योग शिक्षक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मंगेश त्रिवेदी, राज्य प्रभारी डॉ. मनोज निलपावर, जयश्री उंबरे, राज्यसहप्रभारी राहुल येवला, गंगाप्रसाद खरात, जयवंत पाटील, भूषण मेश्राम आदी पदाधिकाऱ्यांनी सूचना केल्या आहेत.

Protected Content