शिक्षक भिका जावरे यांनी गरीब विद्यार्थिनीस घेतले शिक्षणासाठी दत्तक

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । समाजाचे काहीतरी देणं लागतो या भावनाने मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील उपक्रमशिल शिक्षक भिका जावरे यांनी इयत्ता चौथीच्या विद्यार्थीनीला शैक्षणिकदृष्टया दत्तक घेतले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मनुष्य हा सामाजिक प्राणी असून आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो. म्हणून मनुष्याने खारीचा वाटा उचलून समाजाचे ऋण फेडण्याचा प्रयत्न केला पाहिजे या भावनेतून घोडसगाव येथील जि.प.प्राथमिक शाळेतील कार्यरत उपक्रमशिल शिक्षक भिका प्रल्हाद जावरे यांनी त्यांच्याच शाळेत इयत्ता चौथी मध्ये शिकणाऱ्या वि्यार्थ्यांनीला शैक्षणिक दृष्ट्या दत्तक घेतले.

एखाद्या हुशार,गरजू व होतकरू मुलीला दहावीपर्यंत शैक्षणिक दृष्ट्या दत्तक घेऊन तिच्या दहावी पर्यंतच्या शिक्षणाचा खर्च करावा असा मनोदय त्यांनी व्यक्त केला. त्याबाबतीत परिवाराशी आणि शाळेतील सहकाऱ्यांशी चर्चा केली.आणि त्यांच्याच वर्गात इयत्ता चौथीत शिकणारी त्यांचीच विद्यार्थीनी कु. वैष्णवी संदीप हटकर हिला शैक्षणिक दृष्ट्या दत्तक घेण्याचे ठरवले. वैष्णवी ही हुशार व होतकरू असून तिचे वडील वारलेले आहेत.तिची परिस्थिती गरिबीची असून आजी आजोबा तिचे पालन पोषण करतात. “मोठी होऊन आपण आयपीएस अधिकारी होऊ” असा मनोदय वैष्णवी ने आपले मनोगत व्यक्त करताना केला.

शाळेत पार पडलेल्या या कार्यक्रमात भिका जावरे सर यांच्या परिवाराने तिचे 10 वी पर्यंतचे पालकत्व स्वीकारून तिला प्रोत्साहन दिले. यावेळी केंद्रप्रमुख अनिलकुमार पाठक, ग्रामपंचायत सरपंच प्रतिभाताई कोल्हे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिपालीताई दुट्टे, ग्रामपंचायत सदस्य अर्जुन सांगळकर, रामा कोळी, कपिल गुरव, वैष्णवीचे आजोबा भाऊराव हटकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक, विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Protected Content