जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आतड्याच्या आणि छातीचा कर्करोगाने त्रस्त असणाऱ्या दोन महिला रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले. नुकताच दोन्ही रुग्णांवर यशस्वी उपचार करणाऱ्या वैद्यकीय पथकाच्या उपस्थितीत अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन रुग्णालयातून निरोप देण्यात आला.
रुग्णालयातील शल्यचिकित्सा विभागातर्फे या रुग्णांवर उपचार झाले. शहरातील वाघ नगर येथील रहिवासी इंदुबाई उखा सोनवणे (वय ५६) हिला बवासीर हा त्रास होता. पोटात दुखणे व शौचास जाण्यास अडचण येत होती. विविध रुग्णालयात त्यांच्या तपासण्या झाल्या. तेथे योग्य उपचार न झाल्याने त्यामुळे तिच्या नातेवाईकांनी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. महिलेला कर्करोगाची शक्यता तपासून तपासणी केले असता, तिला खालच्या आतड्याचा कर्करोग असल्याचे निदान दिसून आले. त्यानुसार महिलेवर शस्त्रक्रिया करून तिला दिलासा देण्यात आला. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने महिलेला महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ मिळवून देण्यात आला.
दुसऱ्या प्रकरणात, शोभा शोभराम कोळी (वय ४२, रा. साई नगर, जळगाव) ह्या सहा महिन्यांपासून डाव्या स्तनाच्या कर्करोगाने त्रस्त होत्या. त्यांना सुरुवातीला केमोथेरपी देण्यात आल्या होत्या. त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे डाव्या स्तनाची कर्करोगाची शस्त्रक्रिया करण्यात आली. यासाठी विकृतीशास्त्र विभागात एफएनएसी तसेच सिटी स्कॅन, सोनोग्राफी करण्यात आली. त्यांनी रुग्णालयात १७ दिवस यशस्वी उपचार घेतल्यानंतर गुरुवार २१ एप्रिल रोजी त्यांना रुग्णालयातून निरोप देण्यात आला. दोन्ही रुग्णांवर शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. मारोती पोटे, डॉ. संगीता गावित यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. प्रशांत देवरे, डॉ. मिलिंद चौधरी, डॉ. समीर चौधरी, डॉ. शंतनू देशपांडे, डॉ. विपीन खडसे, डॉ. प्रज्ञा सोनवणे यांनी उपचार केले. त्यांना शास्त्रक्रियागृह विभागाच्या इन्चार्ज परिचारिका निला जोशी, कक्ष क्रमांक ७ च्या इन्चार्ज परिचारिका सुरेखा महाजन यांच्यासह कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.