ब्रेकींग : कॉंग्रेस नेते डी. जी. पाटील व राजीव पाटील पक्षातून निलंबीत

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्हा बँक निवडणुकीत पक्षाच्या धोरणाच्या विरूध्द जाऊन बंडखोरी केल्याचा ठपका ठेऊन कॉंग्रेस पक्षातून प्रदेश कार्यकारिणी सदस्य डी. जी. पाटील तसेच जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष राजीव रघुनाथ पाटील यांना निलंबीत करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

काही महिन्यांपूर्वी झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पॅनलमध्ये स्थान न मिळाल्याने प्रदेश कार्यकारणी सदस्य डी. जी. पाटील आणि राजीव रघुनाथ पाटील यांनी स्वतंत्र पॅनलची निर्मिती करून निवडणूक लढविली होती. यात डी. जी. पाटील यांच्या सौभाग्यवती सौ. अरूणाताई पाटील आणि राजीव रघुनाथ पाटील यांनी या पॅनलमधून निवडणूक लढविली होती. मात्र त्यांना यात यश आले नव्हते.

दरम्यान, पक्षाच्या धोरणाच्या विरोधात जाऊन बंडखोरी केल्यामुळे या दोन्ही नेत्यांवर कारवाई होणार असल्याचे संकेत मिळाले होते. या अनुषंगाने त्यांना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून नोटीस बजावून कारणे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. यानंतर आता नाना पटोले यांच्या निर्देशानुसार डी. जी. पाटील, राजीव रघुनाथ पाटील आणि डी. जी. पाटील यांच्या पत्नी सौ. अरूणाताई पाटील या तिन्ही नेत्यांना पक्षातून निलंबी करण्यात आल्याचे पत्र महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस समितीने जारी केले आहे. या पत्राच्या प्रती तिन्ही उमेदवारांसह जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांना देण्यात आलेल्या आहेत.

या संदर्भात आम्ही डी. जी. पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते सायंकाळी याबाबत आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर राजीव पाटील यांनी आपण सध्या कामात असून नंतर भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती दिली. दरम्यान, या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Protected Content