अद्यापही शासकीय योजनांच्या पत्रकात मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीसच……!

233

चोपडा, प्रतिनिधी । येथील पंकज महाविद्यालयात महाराष्ट्र शासन व जिल्हा नियोजन समिती अंतर्गत बेरोजगारासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजना व शासकीय योजनेचा तालुकास्तरीय मेळावा आज दि २७ फेब्रुवारी आयोजित करण्यात आला होता. मात्र, पत्रकावरील माजी मुख्यमंत्र्यांच्या फोटो वरून मेळाव्यासाठी आलेल्या तरुणांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचे पाहावयास मिळाले.

आज सकाळी ११ वाजता आयोजित बेरोजगारासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजना व शासकीय योजनेचा तालुकास्तरीय मेळाव्यात या तरुणांना विविध शासकीय योजनेची माहिती असणारे पत्रक वाटप करण्यात आले. परंतु, हे पत्रक दोन प्रकारचे असल्याचे आढळून आले. यात काही माहिती पत्रक नवीन सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे होते मात्र एका पत्रकावर चक्क माजी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचाच फोटो असल्याने येथील बसलेले बेरोजगार तरुण मंडळीमध्ये संभ्रम निर्माण झाला. यावेळी जिल्हा नियोजन विभागाचे श्री. जोशी, श्री. सुर्यवंशी , तहसीलदार अनिल गावित , पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भरत कोसोदे यांच्यासह अनेक शासकीय कर्मचारी, पदाधिकारी हजर होते. या कार्यक्रमात अनेक शासकीय योजनेचे माहिती पत्रक वाटले जात होते. वेगवेगळ्या योजनेची सविस्तर माहितीसाठी स्टॉल उभारण्यात आले होते. यात महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित ,मुंबई या माहिती पत्रकावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो आढळूनआल्याने भाजपा सरकारच्या योजनाच महाआघाडी सरकार पुढे चालवीत असल्याची उपस्थितांमध्ये चर्चा रंगली होती.

Protected Content