एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । हवामनानुकूल अल्पखर्चिक शाश्वत शेती तंत्रज्ञान अभियानाअंतर्गत एरंडोल तालुक्यातील पिंप्री बुद्रुक येथे शेतकरी मेळावा घेण्यात आला. अध्यक्षस्थानी सरपंच कैलास सोनवणे होते. व्यासपीठावर ग्रामविकास अधिकारी संजय पाटील, निवृत्त पोलीस अधिकारी गणेश ठाकरे, सरपंच जयश्री पाटील, रवींद्र पाटील उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना कृषी विज्ञान केंद्र जळगावचे विषयतज्ञ डॉ. स्वाती कदम यांनी सांगितले की, बदलत्या हवामानानुसार शेती क्षेत्रासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. शेतकऱ्यांनी दरवर्षी जमिनीची मशागत, बीजप्रक्रिया, पाणी व कीड व्यवस्थापन, पीक पद्धती या गोष्टींवरही भर दिल्यास निश्चितच उत्पन्नाची हमी मिळेल. कृषी प्रक्रियेशी निगडी शासनाच्या विविध कल्याणकारी योजना आहेत या योजनांचा लाभ शेतीला जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांनी करावा, कृषी विज्ञान केंद्रतर्फे कौशल्य आधारित विविध उपक्रम राबवले जातात, त्यात शेतकऱ्यांनी व महिला बचत गटांनी सहभाग घेऊन स्वयंरोजगाराचा मार्ग निवडावा, असे डॉ. तुषार गोरे यांनी आवाहन केले. रासायनिक कीटकनाशक, खतांच्या अतिवापरामुळे सध्याची शेती खर्चिक झाली आहे. शेतकऱ्यांनी जैविक शेती तंत्राकडे वळावे, जमिनीचाही पोत सुधारण्यास मदत होईल, तृणधान्य पिकांवर भर दिल्यास जमिनीतील नत्र, स्फुरद, पालाश या घटकांचे प्रमाण टिकून राहील असे, कृषी सहाय्यक कुंदन पाटील यांनी सांगितले. बीटीएम भूषण वाघ यांनी आत्माच्या विविध योजनांची माहिती दिली, या वेळी उपस्थित शेतकऱ्यांना अल्पखर्चिक शेती तंत्रज्ञान पुस्तिका व महिलांना परसबागेचे किट देण्यात आले. हा कार्यक्रम अफार्म, नेहरू युवा मंडळ व कृषी विभागाच्या सहकार्याने घेण्यात आला. अभियाना अंतर्गत पिंप्री बुद्रुक येथे शेतकरी गटाची स्थापनाकरून वर्षभर शेतीविषयक उपक्रम राबवले जाणार आहेत. प्रकल्प अधिकारी शांताराम साकोरे व राहुल पाडोळे यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम झाला. सूत्रसंचालन व प्रास्ताविक नितीन नेरकर यांनी तर आभार कृष्णा पाटील यांनी मानले. स्वावलंबी शेतकरी गटाचे सहकार्य लाभले.