कर्जबाजारीपणा व आजाराला कंटाळून वृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या

suside

जळगाव, प्रतिनिधी | लाखोंचे कर्ज व आजाराला कंटाळून एरंडोल तालुक्यातील कढोली येथील कर्जबाजारी वृद्ध शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे की, माझ्यावर १ लाख रूपयांचे पीक कर्ज व इलेक्ट्रीक मोटारीचे १ लाखाचे बील आणि मागील वर्षाचा दुष्काळ व आता सततच्या पावसामुळे पिंकांची झालेली नासाडी. तसेच विविध आजारांनी त्रस्त असून मी आत्महत्या करित आहे.  या आशयाची चिठ्ठी लिहून लक्ष्मण ओंकार पाटील (वय ७० वर्ष ) या कर्जबाजारी वृध्द शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना शनिवारी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली.  कढोली गावात लक्ष्मण पाटील हे पत्नी लिलाबाई व मुले हिंमत व लिलाधर यांच्यासह वास्तव्यास होते. शेती काम करून ते उदरनिर्वाह चालवीत होते. मात्र, मागील वर्षीचा दुष्काळ तसेच यावर्षी सततच्या पावसामुळे पिकांची नासाडी झाल्याने लक्ष्मण पाटील हे नैराश्यात होते. सोबतच डोक्यावर कर्जाचे डोंगर आणि मुळव्याध व गुडघे दुखीच्या आजारामुळे ते त्रस्त होते.

गावाला जातो सांगून पडले घराबाहेर  

शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास लक्ष्मण पाटील हे गावाला जाऊन येतो, असे कुटूंबीयांना सांगून घराबाहेर पडले होते. वैजनाथ-कढोली गावाच्या रस्त्यावरून सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास एक दुध विक्रेता जात असतांना रस्त्याच्याकडेला कुणीतरी वृध्द व्यक्ती मयत स्थितीत पडून असल्याचे त्याला दिसले़. त्याने त्वरित कढोली गावातील पोलीस पाटील रामदास सोनवणे यांना कळविले. यानंतर सोनवणे यांनी त्वरित एरंडोल पोलिसांना याबाबत माहिती दिली़. थोड्या वेळाने मृत व्यक्ती ही कढोली गावातील लक्ष्मण पाटील असल्याचे समोर आले. त्यांना त्वरित जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले. परंतू, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पाटील यांना तपासणीअंती मृत घोषित केले. मृतदेहाची झडती पोलिसांनी व नागरिकांनी घेतली असता खिशामध्ये सुसाईड नोट आढळून आली.  पोलिसांनी ती चिठ्ठी ताब्यात घेतली आहे़. दरम्यान, पाटील यांच्या आत्महत्येची बातमी गावात पसरताच ग्रामस्थांसह कुटूंबीयांची जिल्हा रूग्णालयात गर्दी केली होती़.  याबाबत सीएमओ अपूर्वा चित्ते यांच्या खबरीवरून पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़.

Protected Content