शाळाबाह्य विद्यार्थ्याना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी सर्वेक्षण

 

पहूर , ता . जामनेर, प्रतिनिधी । राज्यभरात   शिक्षणाचा हक्क अधिनियम  आरटीई अंतर्गत ६ ते १४वयोगटातील शाळाबाह्य बालकांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी विशेष अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत पहूर केंद्रात आतापर्यंत सुमारे ४ हजार कुटुंबांना शिक्षकांनी भेटी देऊन बालकांच्या शिक्षणाबाबत माहिती जाणून घेतली असता यात १३ बालकांची नोंद करण्यात आली आहे. 

शिक्षणाचा हक्क अधिनियम  आरटीई अंतर्गत ६ ते १४वयोगटातील प्रत्येक बालकास मोफत आणि सक्तीचे शिक्षण मिळाले पाहिजे, यासाठी शासन-प्रशासन प्रयत्नशील आहे. प्रत्येक मूल शाळेत दाखल झाले पाहिजे आणि दाखल झालेले मूल आनंदाने शिकले पाहिजे यासाठी शिक्षण व्यवस्था बालकेंद्रित झालेली आहे. परंतु तरीही स्थलांतर, आजारपण, बेरोजगारी, पालकांचे अज्ञान आदी कारणांमुळे असंख्य बालके शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून कोसो दूर आहेत. अशा शाळाबाह्य  बालकांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रधान सचिव डॉ. वंदना कृष्णा यांच्या आदेशान्वये राज्यभरात १ ते १० मार्च २०२१ दरम्यान शाळाबाह्य विद्यार्थी विशेष अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत पहूर केंद्रात आतापर्यंत सुमारे ४ हजार कुटुंबांना शिक्षकांनी भेटी देऊन बालकांच्या शिक्षणाबाबत माहिती जाणून घेतली.या सर्वेक्षणात २ शाळाबाह्य बालकांसह स्थलांतरित होऊन गेलेले ३ तर स्थलांतरित होऊन पहुर गावात आलेल्या ८ बालकांचा बालरक्षक शिक्षकांनी शोध घेतला आहे.

दरम्यान,नुकतीच पहूर गटसाधन केंद्रात केंद्रप्रमुख भानुदास तायडे यांनी गटशिक्षणाधिकारी विजय सरोदे यांच्या आदेशान्वये केंद्रस्तरीय सर्वेक्षण समितीची स्थापना केली. या समितीच्या अध्यक्षपदी केंद्रप्रमुख भानुदास तायडे यांची निवड करण्यात आली. राजू पाटील, हिवरखेडे, निर्गुणा महाजन, बाबुराव पवार, सोपान तनपुरे, लोंढरी, ज्ञानेश्वर डिके, शेरी, मोहन मराठे साधन व्यक्ती , चव्हाण सर , समावेशित शिक्षण , बालरक्षक शंकर भामेरे , रवींद्र खोडपे सचिव यांची निवड करण्यात आली. पहूर केंद्रातील जिल्हा परिषद शाळा तसेच खासगी व्यवस्थापनाच्या मराठी उर्दू शाळा, उच्च माध्यमिक विद्यालय, माध्यमिक विद्यालयांचे सर्व शिक्षक प्रगणक म्हणून कार्य करीत आहेत. कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद आहेत. मात्र तरीही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी शासनाच्या आदेशानुसार सर्व शिक्षक आरोग्याच्या दृष्टीकोनातून पुरेशी काळजी घेऊन सर्वेक्षणाच्या कामी योगदान देत आहेत. गटशिक्षणाधिकारी विजय सरोदे, शिक्षण विस्तार अधिकारी तसेच केंद्रप्रमुख भानुदास तायडे सनियंत्रक मुख्याध्यापकांचे प्रगणक शिक्षकांना मार्गदर्शन मिळत आहे. सर्वेक्षणात आज ६ मार्च पर्यंत  ४१६२ कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले असून २ शाळाबाह्य बालकांचा शिक्षकांनी शोध घेतला आहे. तसेच स्थलांतरीत होऊन गेलेल्या ३ विद्यार्थ्यांची तर  परजिल्ह्यातून स्थलांतरित होऊन आलेल्या ८ विद्यार्थ्यांची नोंद घेण्यात आली आहे. १० मार्चपर्यंत शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेण्याच्या उद्देशाने हे सर्वेक्षण सुरू राहणार असून यामुळे अनेक शाळाबाह्य विद्यार्थ्यांची शाळेची वाट सुकर होणार आहे.

 

Protected Content