मुंबई । राज्य सरकारी कर्मचार्यांना पाच दिवसांचा आठवडा राज्य मंत्रीमंडळाने आज जाहीर केल्यानंतर आता शाळादेखील आठवड्यातून पाच दिवसच चालू रहाव्यात अशी मागणी समोर आली आहे.
राज्य कर्मचार्यांसाठी आज पाच दिवसांचा आठवडा करण्यात आला. त्याच पध्दतीत राज्यातील शाळांनादेखील पाच दिवसांचा आठवडा करण्याची मागणी जनता शिक्षक महासंघाचे मुंबई-कोकण विभागाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी आज शालेय शिक्षण विभागाकडे लेखी मागणी केली आहे.
माध्यमिक शाळा संहितेनुसार शाळा पाच दिवसांचा आठवडा करू शकतात. अनेक इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी आपल्या शाळांचा आठवडा पाच दिवसांचा केला आहे. पण बहुतांश शाळा अजूनही सहा दिवस भरतात. शनिवारी अर्धा दिवस शाळा असते. शनिवारच्या अर्ध्या दिवसाच्या तासिका सोमवार ते शुक्रवार विभागून देता येऊ शकतात त्यामुळे पाच दिवसांचा आठवडा शक्य असल्याचे अनिल बोरनारे यांनी सांगितले.