अकोला परिमंडलात महावितरणचा उपक्रम; ‘मिशन ९० दिवस ‘

बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अकोला परिमंडलातील वीज ग्राहकांकडील वीज बिलाची थकबाकी शुन्य करणे, परिमंडलाला अपघात फ्री करणे,वीज चोरीला आळा घालणे,ग्राहकांच्या तक्रारींचा तत्काळ निपटारा करणे,दर्जेदार वीज सेवा देणे, मागेल त्या ग्राहकाला ताबडतोब वीज पुरवठा उपलब्ध करून देणे या व अश्या ग्राहकाभिमूख सेवा देण्यासाठी महावितरण अकोला परिमंडलात मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांच्या मार्गदर्शनात ‘मिशन ९० दिवस’ राबविण्यात येत आहे.

जानेवारी,फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्यात राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमात वरीष्ठ अधिकारी ते परिमंडलाअंतर्गत अकोला,बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यातील शेवटचा कर्मचारी सहभागी करण्यात आलेला आहे.

शंभर टक्के वीज बिल वसुलीला प्राधान्य :-

परिमंडलातील थकबाकी असलेल्या ग्राहकांकडील वीज बिल वसुलीसाठी वसुली मोहिम राबवून त्या ग्राहकांचा वीज पुरवठा तत्काळ खंडित करणे,पार्ट पेमेंट न घेणे, तसेच ग्राहकांना वेळेत आणि नियमित वीज बिल भरण्याची सवय लागावी यासाठी यापुढे वीज पुरवठा खंडित करण्याची मोहिम सुरू करण्यात आली आहे.महावितरणची ही मोहिम यापुढे नियमित आणि सतत चालू ठेवण्यात येणार आहे. वीज बिल वसुली हा महावितरणचा आत्मा असल्याने ती वेळेत व्हावी यासाठी प्रसंगी पोलिसाची मदत घेऊन ३१ मार्च पर्यंत परिमंडळ कार्यालयाची वीज बिलाची थकबाकी शुन्य करण्यावर भर देण्यात आला आहे.

अचूक वीज बिलासोबत वेळेत तक्रारींचा निपटारा होणार :-

महावितरणच्या या उपक्रमात शंभर टक्के वीज ग्राहकांना अचूक वीज बिल देणे, ग्राहकांच्या वीज सेवेशी संबंधित किंवा वीजबिलाशी संबंधित तक्रारी ताबडतोब सोडविण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.याशिवाय ग्राहकांच्या तक्रारी महावितरणच्या माणकांनुसार निकाली काढण्यासाठी या तक्रांरीचा पाठपुरावा मंडळ कार्यालयांकडून दर आठवड्याला घेण्याला सुरूवात करण्यात आलेली आहे.तसेच ग्राहकांच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी तीनही जिल्ह्यातील कार्यकारी अभियंता प्रशासन यांच्याशी संपर्क करण्याबाबत याआधिच कळविण्यात आले आहे.

वाणिज्यिक आणि वितरणहानी कमी करून दर्जेदार वीज पुरवठ्यावर भर :-

वाणिज्यिक आणि वितरण हानी कमी करण्यासाठी वीज चोरी असलेल्या भागात एरीयल बंच केबल (AB cable) टाकणे, वीज चोरी मोहिम सतत आणि अधिक गतीने राबविणे.याशिवाय ११ केव्ही व ३३ केव्ही वीज वाहिन्यांची देखभाल दुरूस्ती करून त्या वाहिन्यांची व वीज साहित्यांचे सक्षमीकरण करणे. फिडर वेगळे करणे आदी उपक्रम हाती घेऊन ग्राहकांना नियमित आणि दर्जेदार वीज पुरवठा देण्यावर भर देण्यात आला आहे.

मागेल त्याला वीज जोडणी :-

वीज ही विकासाची जननी असल्याने परिमंडलात आवश्यक कागदपत्रासह वीज जोडणीसाठी अर्ज करण्यात आलेल्या प्रत्येक ग्राहकाला ताबडतोब वीज जोडणी देण्यात येणार आहे. पायाभूत सुविधा आवश्यक नसलेल्या ग्राहकांना २४ ते ४८ तासात तर ,पायाभूत सुविधेची गरज असलेल्या ग्राहकांना महावितरणच्या कृतीमाणकांनुसार वीज जोडणी देण्यात येणार आहे.

अपघात विरहीत परिमंडळ कार्यालय करण्यावर भर :-

परिमंडळ कार्यालयाअंतर्गत अपघात प्रवण स्थळ शोधणे,त्या स्थळावरील दुरूस्ती कार्य करणे,वीज दुरूस्तीचे काम करतांना सुरक्षा साधणे वापरणे, झिरो लाईनमनवर कारवाई करणे इत्यादी माध्यमातून होणाऱ्या अपघातावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे

Protected Content