मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जवळपास १२५ कोटींच्या संपत्तीचे मालक

मुंबई (वृत्तसंस्था) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषद निवडणुकीसाठी आज आपल्या उमेदवारी अर्जासोबत प्रतिज्ञापत्रावर आपल्या संपत्तीचे विवरण सादर केले आहे. यानुसार त्यांच्याकडे जवळपास १२५ कोटी रुपयांची संपत्ती असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांचे प्रतिज्ञापत्र अद्याप निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर अपलोड करण्यात आलेले नाही.

 

 

उद्धव ठाकरे यांच्याकडे एकूण ३ बंगले आहेत. ज्यापैकी वांद्रे पूर्व कला नगर येथे ‘मातोश्री’ बंगला आणि ‘मातोश्री’च्या अगदी समोर बांधले जात असलेले नवं घर. सोबतच कर्जत येथे ठाकरे यांचं फार्म हाऊस आहे. तर विविध कंपन्यांचे भाग, विविध कंपन्यांमध्ये भागीदारी आणि त्यांचे डिव्हिडंड असे ठाकरे यांच्या उत्पन्नाचे विविध स्रोत आहेत. उद्धव ठाकरे यांच्याकडे स्वतःच्या मालकीचे एकही वाहन नसल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. तर प्रतिज्ञापत्रात दाखल गुन्हे व तक्रारींचाही तपशील देण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध एकूण २३ गुन्हे दाखल होते. त्यापैकी १२ गुन्हे रद्द झालेले आहेत तर अन्य खासगी तक्रारी आहेत. उद्धव ठाकरे हे संपत्ती जाहीर करणारे दुसरे ठाकरे ठरले आहेत. त्याआधी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी संपत्ती जाहीर केली होती. तर आदित्य ठाकरे यांनी उमेदवारी अर्जासोबत प्रतिज्ञापत्रात त्यांच्याकडे एकूण ११ कोटी ३८ लाखांची संपत्ती  असल्याचे जाहीर केले होते. तसेच १० कोटी ३६ लाखांच्या बँक ठेवींचा समावेश होता. आदित्य यांच्याकडे ६४ लाख ६५ हजार दागिने आणि २० लाख ३९ हजार रुपयांचे बॉन्ड्स आहेत. याशिवाय आदित्य यांच्याकडे एक बीएमडब्ल्यू कारदेखील आहे. या कारची किंमत ६ लाख ५० हजार असल्याची माहिती आदित्य यांनी प्रतिज्ञापत्रात दिली होती.

Protected Content