शार्टसर्कीटमुळे लागलेल्या आगीत शाळेतील साहित्य जळून खाक

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील देवगाव देवळी गावातील जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक शाळेत शुक्रवारी २१ एप्रिल रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास अचानक झालेल्या शार्टसर्कीटमुळे लागलेल्या आगीत शाळेचे साहित्य जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील देवगाव देवळी गावातील जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक शाळेत शुक्रवारी २१ एप्रिल रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास झालेल्या शार्टसर्कीटमुळे आग लागली. या आगीत शाळेत बॅन्च, शालेय साहित्य, दस्तावेज, कपाट, पंखे, खेळणीचे साहित्य, टेबल खुर्च्या, पुस्तके आदी इतर साहित्य जळून खाक झाले आहे. जिल्हा परिषद शाळेतून धूर निघत असल्याचे शेजारी राहणारे रविंद्र पाटील यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ गावातील ग्रामस्थांच्या मदतीने आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर अमळनेर नगरपालिकेचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला व आग विझविण्यात आली. या आगीत जवळपास ७५ हजारांचे नुकसान झाल्याचे प्रथम दर्शी दिसून येते. देवळी येथील ग्रामस्थांच्या समयसूचकतामुळे पुढील अनर्थ टळल्याचेही बोलले जात आहे. दरम्यान गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील यांनी देवळी शाळेला भेट देत नुकसानीची पाहणी करीत संपूर्ण माहिती जाणून घेतली व सदर घटनेचा पंचनामा केला. यावेळी केंद्रप्रमुख,सरपंच उपसरपंच तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

Protected Content