वर्धा :वृत्तसंस्था । शहरातील मुथूट फिनकॉर्प फायनान्सच्या कार्यालयावर सशस्त्र दरोडा पडला होता . शाखा व्यवस्थापक या गुन्ह्यात सामील असल्याची माहिती धक्कादायक माहिती समोर आली आहे.
चार आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून ९ किलो ७०० ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे. वर्ध्यात दिवसाढवळ्या मुथूट फायनान्सच्या शाखेवर दरोडा पडल्याने खळबळ उडाली होती. दरोडेखोराने महिला कर्मचाऱ्याच्या डोक्याला पिस्तूल लावून, चाकूचा धाक दाखवून साडेतीन किलो सोने आणि ३ लाख रुपयांची रोख असा एकूण अंदाजे ६६ लाखांचा ऐवज चोरून नेल्याची प्राथमिक माहिती मिळाली होती. मात्र, पोलिसांनी आरोपींकडून ९ किलो ७०० ग्रॅम सोने जप्त केले आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक नीलेश ब्राह्मणे, ठाणेदार सत्यवीर बंडीवार, ठाणेदार धनाजी जळक यांनी तपास केला. काल मुथूट फिनकॉर्प फायनान्स कंपनीच्या कार्यालयावर घातलेल्या दरोड्यात शाखा व्यवस्थापकाचाच हात असल्याचे समोर आले आहे. चार आरोपींना पोलिसांनी यवतमाळ येथून ताब्यात घेतले असून, त्यात शाखा व्यवस्थापकाचा समावेश आहे. त्यांच्याकडून एक पिस्तूल, दोन चारचाकी वाहने, सोने जप्त केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.