तुम्हाला शरद पवारांचा पंटर, खबऱ्या, चमचा म्हणू शकतो

 

मुंबईः वृत्तसंस्था । सामनाच्या आग्रलेखातून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा फेकूचंद असा उल्लेख शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला होता. गोपीचंद पडळकर यांनी एक खरमरीत पत्र लिहित राऊतांच्या टीकेचा समाचार घेतला आहे.

पडळकरांनी राऊतांवर शाब्दिक बाण चालवत हल्ला चढवला आहे. ‘संजय राऊत आपला पगार किती आपण बोलता किती?,’ असा खोचक सवालही केला आहे.

‘गोपीचंद पडळकर यांनी पत्रात लिहलं आहे की, खरंतर मी आपणास शरद पवारांचा पंटर, खबऱ्या, चमचा असा उल्लेख करु शकलो असतो. परवाच्या सामना दैनिकाच्या अग्रलेखात आपण माझा उल्लेख फेकूचंद असा केला. त्या पद्धतीने आपला उल्लेख मलाही करता आला असता. पण ते माझे संस्कार आणि संस्कृती नाही. प्रत्येकाशी नम्रपणे बोलले पाहिजे. प्रत्येकाचा उल्लेख सन्मानाने केला पाहिजे हे संस्कार मला माझ्या आई वडिलांनी दिले आहेत,’ अशा शब्दांत पडळकरांनी राऊतांवर जोरदार टीका केली आहे.

‘मी आमदार झालो तरी माझ्या समाजाशी, समाजाच्या सुखदु:खांशी मी नाळ तोडलेली नाही. माझ्या दु:खी धनगर समाजाचे दु:ख वेशीवर टांगण्यासाठी मी एकदा नाही हजारवेळा येईन. ते स्वातंत्र्य आपण वा आपल्या सरकारने मला दिलेले नाही. ते स्वातंत्र्य मला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेने दिले आहे. पण सत्तेच्या धुंदीत त्यांची लेखणी फक्त विरोधकांवर चालते. मराठा मोर्चांना मुका मोर्चा म्हणणाऱ्या सामनाकडून दुसरी अपेक्षाही काय करणार,’ असा टोला त्यांनी लगावला आहे.

 

‘राऊतांनी आपली लेखणी कधी धनगर आरक्षण व भटक्यांच्या प्रश्नांसाठी झिजवली याचेही उत्तर द्यावे. सगळं लक्ष मुंबईच्या नाईट लाईफमध्ये असणाऱ्या बोलघेवड्यांना महाराष्ट्रात काय सुरु आहे याचा अंदाज तरी कसा येणार,’ असा शाब्दिक वार त्यांनी केला आहे.

‘फक्त टीका केली म्हणून एका नटीला जेरीस आणायचं अन् उखाड दिया म्हणत अशा भुरट्या मर्दानगीचं प्रदर्शन मांडायचं हे कसलं स्त्रीदाक्षिण्य? ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचे तुम्ही दाखले देत आपलं राजकारण करता त्यांचा आदर्श विसरलात का? संजय राऊत आपला पगार किती आपण बोलता किती?’ असा खोचक सवाल पडळकरांनी केला आहे.

‘आपल्या पक्षाचे जेवढेही खासदार निवडून आले ते भाजपच्या आणि विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भरवश्यावर निवडून आलेले आहेत, याचा इतका लवकर विसर पडला आपल्याला? पंतप्रधान मोदींवर वाट्टेल तसे आरोप करण्याची आपली लायकी तरी आहे का? उठसुठ कोणत्याही विषयावर आणि व्यक्तीवर काहीही बोलण्याचे लायसन्स आपल्याला मातोश्रीवरुन मिळाले की बारामतीच्या गोविंदबागेतून मिळाले हे महाराष्ट्राला कळू द्या. शरद पवार यांच्या विषयी मी मध्यंतरी काही विधानं केली. तेव्हा आपला चांगलाच जळफळाट झाला होता. ते साहजिकच आहे, कारण आपल्या निष्ठा मातोश्रीपेक्षा पवारांच्या चरणी अधिक आहेत, असे शिवसेनेतील आमचे मित्र सांगतात. माझ्यात सभ्यता आहे आणि अजूनतरी ती मी आपल्याबाबतीत सोडलेली नाही. पण आपली एकूणच पवारांबाबतची हुजरेगिरी पाहता आपल्याला तीच उपाधी मी देखील द्यावी, असं राहून राहून वाटतं असा चिमटा त्यांनी काढला आहे.

Protected Content