शहापूर येथे ‘ई पीक पाहणी’बद्दल प्रशिक्षण

जामनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील शहापूर येथील नारायण आनंदा बोरसे विद्यालयात विद्यार्थ्यांना ‘ई पीक पाहणी व्हर्जन 2.00’ बाबत प्रशिक्षण देण्यात आले. याप्रसंगी काही शेतकर्‍यांना प्रत्यक्ष शेतावर जाऊन ‘ई पीक पाहणी अॅप’मध्ये माहिती कशी भरावी. याबाबत मंडळ अधिकारी व तलाठी यांनी मार्गदर्शन केले.

यंदाच्या खरीप हंगामासाठी ई पीक पाहणीची प्रक्रिया दिनांक दि. १ ऑगस्टपासून सुरू झालेली आहे. त्यासाठी महसूल विभागाने ‘ई पीक पाहणी अ‍ॅप व्हर्जन २.००’ उपलब्ध करुन दिलेले आहे. या अॅपद्वारे शेतकर्‍यांनी आपली पीक पेर्‍याची नोंद करायची आहे.

या नोंदी पीक विमा, पीक कर्ज, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास भरपाई मिळणेकामी महत्वाच्या असतात. त्याबाबत नारायण आनंदा बोरसे विद्यालय, शहापूर ता.जामनेर येथे विद्यार्थ्यांना वाकडी भाग मंडळ अधिकारी विष्णू पाटील यांनी प्रशिक्षण दिले.

शाळेतील बहुतांश विद्यार्थी हे शेतकरी कुटुंबातील असल्याने व नवीन पिढी ही मोबाइल तंत्रज्ञानाशी परिचित असल्यामुळे या विद्यार्थ्याद्वारे ‘ई पीक पाहणी अ‍ॅप’ प्रत्येक शेतकर्‍यापर्यंत पोचण्यास मदत होईल. असे विष्णू पाटील यांनी सांगितले. ई पीक पाहणी अ‍ॅप व्हर्जन २.०० डाऊनलोड करण्यापूर्वी आपल्या फोनमधील ई पीक पाहणी अ‍ॅपचे जुने व्हर्जन फोनमधून काढून टाकणे आवश्यक आहे. तसेच एखाद्या शेतकर्‍याने मागील वर्षी खातेदार म्हणून अ‍ॅपमध्ये नोंदणी केलेली असेल तर पुन्हा नोंदणी करण्याची गरज नाही. मात्र मोबाईल क्रमांक तोच वापरावा लागेल. शेतकरी यांनी भरलेली पीक पाहणीची माहिती स्वयं प्रमाणित मानण्यात येणार आहे त्यामुळे कायम पड, पीकनिहाय लागवड केलेले क्षेत्र, जलसिंचनाचे साधन, बांधावरील झाडे इ. माहिती अचूक भरणे आवश्यक आहे.

नवीन अ‍ॅपमध्ये मिश्र पिकांमध्ये मुख्य पिकासह तीन घटक पिके नोंदविण्याची सुविधा आता उपलब्ध आहे. पीक पाहणी भरतांना जर काही चूक झाली असेल तर शेतकरी यांना स्वतः ४८ तासाचे आत एकदाच पीक पहाणीची दुरूस्ती करता येणार आहे. किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत संमती नोंदविण्याची सुविधा सुद्धा अ‍ॅप दिलेली आहे. त्यामुळे खरेदी केंद्रामध्ये रांग लावण्याची गरज नाही. खरीप हंगाम- १ ऑगस्ट ते १५ ऑक्टोबर, रब्बी हंगाम- १५ नोव्हेंबर ते ३१ जानेवारी व उन्हाळी हंगाम १५ फेब्रुवारी ते १५ एप्रिल या कालावधी दरम्यान त्या त्या हंगामाची पीक पाहणी भरता येणार आहे. अ‍ॅप वापरतांना येणार्‍या अडचणीचे निराकरण करण्यासाठी अॅपमध्येच मदतहे बटन देण्यात आलेले आहे. त्यातून अॅपमध्ये नोंदणी करणेबाबत मार्गदर्शन करण्यात आलेले आहे.

 

शहापूर गावातील शेतकर्‍यांना ई पीक पाहणी अ‍ॅपद्वारे पीक पेरा भरणेकामी मदतीसाठी गावातीलच १० तरुणांनी स्वयंसेवक म्हणून जबाबदारी घेतली असून त्यांनाही प्रशिक्षण देण्यात आले आहे. याबरोबरच पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांनी त्वरित ई केवायसी करुन घेण्याबाबत आवाहन करण्यात आले. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील कर्त्या सदस्याचा प्रधानमंत्री जीवन ज्योति बिमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना या दोन्ही योजनांचे फॉर्म भरुन घेण्यासाठी तलाठी यांचेशी संपर्क करावा असेही मंडळ अधिकारी यांनी सांगितले.

या प्रशिक्षणाचे वेळी विद्यालयाचे संचालक अशोक पाटील, राजश्री भंगे तलाठी शहापूर, पोलीस पाटील आनंदा सुशीर, शेतकरी गोबा पाटील, भगवान चौधरी, रामा राजपूत, रोजगार सेवक प्रल्हाद पाटील हे उपस्थित होते. त्यानंतर काही शेतकर्‍यांना प्रत्यक्ष शेतावर जाऊन ‘ई पीक पाहणी अ‍ॅपमध्ये माहिती कशी भरावी. याबाबत मंडळ अधिकारी व तलाठी यांनी मार्गदर्शन केले.

Protected Content