पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी पथकांची नियुक्ती

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | होऊ घातलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने भरारी पथक तसेच निगराणी पथकाची नियुक्ती केली आहे.

जळगाव जिल्हा माहिती कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्हा निवडणूक अधिकारी, जळगाव तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ अमन मित्तल यांनी या निवडणूकीसाठी व्हिडीओ देखरेख पथक भरारी पथक तसेच क्षेत्रीय अधिकारी यांची नियुक्ती केली आहे.

या अनुषंगाने जिल्हा दंडाधिकारी अमन मित्तल यांनी नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणूकीसाठी नियुक्त केलेले भरारी पथक व व्हिडीओ देखरेख पथक यांच्या प्रमुखांना शासन अधिसूचना निर्गमित केल्याच्या दिनांकापासून निवडणूक कालावधीपर्यंत तसेच क्षेत्रीय अधिकारी (विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांचे अधिकार बहाल नाहीत असे अधिकारी) यांना दिनांक २८ जानेवारी, २०२३ रोजी सायंकाळी १८.०० वाजेपासून ते दिनांक ३० जानेवारी, २०२३ रोजी मतदान पूर्ण होईपर्यंत या कालावधीकरीता विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून घोषित केले आहे. तसेच त्यांना फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १२९, १३३. १४३ व १४४ अन्वये शक्ती प्रदान केल्या आहेत. असेही जिल्हादंडाधिकारी अमन मित्तल यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Protected Content