शहरातील हात पंप दुरुस्त करा ; नगरसेविका वर्षा शिंदे यांची मागणी

एरंडोल, प्रतिनिधी । शहरातील मधुकर नगर व लगतच्या रहिवाशांना पाणीपुरवठा करणारी पाईप लाईन नसल्याने पाण्यासाठी रहिवाशांची गैरसोय होत असल्याची व प्रभाग क्रमांक १ मधील व शहरातील ना दुरुस्त हात पंप दुरुस्त करण्याची मागणी नगरसेविका वर्षा शिंदे यांनी मुख्याधिकारी किरण देशमुख,नगराध्यक्ष रमेश परदेशी यांना केली आहे.

एरंडोल शहरातील प्रभाग क्रमांक १ मधील मधुकर नगर या भागा लगत जय भोले नगर असुन याठिकाणी जवळपास ३० ते ३५ कुटुंब रहिवास करतात. याठिकाणी अजूनही नगर पालिकेतर्फे पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन टाकण्यात आलेली नसल्याने येथील महिला वर्गाला नेहमी पाण्यासाठी भटकंती करुन पाणी भरावे लागते. परंतु, सध्या लॉक डाऊन असल्याने या महिला वर्गाला कुठे दुसरीकडे पाणी भरण्यास जाता येत नाही. आसपास कुठल्याही प्रकारे पाण्याची सोय नाही. तसेच एरंडोल नगर पालिकेतर्फे या दोघ कॉलनी जवळ असलेल्या मधुकर नगर येथे ओपन स्पेससाठी लाखों रुपये खर्च करुन हरित पट्टा विकसित केलेला आहे. याठिकाणी भविष्यात हरित पट्टा विकसित करण्यासाठी पाण्याची गरज भासेल म्हणुन याठिकाणी नगर पालिका फंडातून अथवा शासनाच्या तात्पुरती पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाईप लाईन टाकुन होणारी गैरसोय थांबवावी असे निवेदनात म्हटले आहे. तर याच प्रभागातील आदर्श नगरची शेवटची लाईन किशोर महाजन यांच्या घरापासुन ते किरण पाटील यांच्या घरापर्यंत पाणीपुरवठा करणारी पाईप लाईन ही कमी व्यासाची असल्याने व शहरातील अनेक कॉलनी परिसरात अशाच पद्धतीच्या पाईप लाईन असल्याने होणारा पाणीपुरवठा कमी दाबाने होतो व पाणी कमी भरले जाते. शहरात होणारा पाणीपुरवठा हा ५ ते ६ दिवसांनी होत असल्याने आलेलं पाणी लोकांना पुरत नाही व त्यामुळे पाणी टंचाई भासते.तरी या समस्यांचे लवकरात लवकर निरसन व्हावे अशी मागणी केली आहे. सदर निवेदन मुख्याधिकारी व नगराध्यक्षांसोबतच पालकमंत्री गुलाबराव पाटील व जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांना देखील दिले आहे.

Protected Content