शरद पवारांच्या भेटीगाठी ४ दिवस बंद

पुणे, वृत्तसेवा । मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सुरक्षेसाठी तैनात सहा पोलिसांना करोना संसर्गाची लागण झाली असून शरद पवार यांच्या करोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तरीही पुढचे चार दिवस आता त्यांच्या भेटीगाठी कुणाशी होणार नाहीत . आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली.

शरद पवार यांची रॅपिड अँटिजेन डीटेक्शन टेस्ट घेण्यात आली असता त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात ही चाचणी करण्यात आल्याचे राजेश टोपे यांनी नमूद केले.

खबरदारी म्हणून शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानातील संपूर्ण स्टाफची तसेच सुरक्षा ताफ्यातील कर्मचारी-अधिकाऱ्यांची करोना चाचणी घेण्यात आली. त्यात ६ सुरक्षा कर्मचारी वगळता बाकी सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, पुढचे काही दिवस कोणताही दौरा न करण्याची विनंती शरद पवार यांना करण्यात आली आहे, असे टोपे यांनी सांगितले. शरद पवार यांनीही पुढील चार दिवस कुणालाही न भेटण्याचा निर्णय घेतला आहे.

Protected Content