भोपाळ (वृत्तसंस्था) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात नसून भगवान रामाच्या विरोधात आहे. शरद पवार यांचे हे वक्तव्य रामद्रोही असल्याची टीका भाजप नेत्या उमा भारती यांनी केली. पवारांनी राम मंदिराच्या भूमिपूजनावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला होता.
महाराष्ट्रातील भाजप नेत्यांकडून कालच शरद पवार यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला होता. मंदिर बांधून कोरोना बरा होत नाही, असे पवारांना सुचवायचे असेल तर मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तरी पंढरपुरला जाऊन कोरोना नष्ट कर, असे साकडे विठ्ठलाला का घातले, असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी विचारला होता. येत्या ५ ऑगस्ट रोजी अयोध्येत राम मंदिराचा भूमीपूजन सोहळा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा भूमीपूजनचा सोहळा संपन्न होणार आहे. दरम्यान, पवारांच्या वक्तव्यावर उमा भारती यांनी देखील सडकून टीका केली आहे. शरद पवार यांचे हे वक्तव्य रामद्रोही आहे. ते पंतप्रधान मोदींच्या विरोधात नसून भगवान राम यांच्याविरोधात आहे, असे उमा भारती म्हणाल्या. श्रावणातील तिसऱ्या सोमवारी गणपतीची पूजा करण्यासाठी त्या भोपाळमधील प्राचीन गणेश मंदिरात गेल्या होत्या.