मुंबई : वृत्तसंस्था । दिल्लीत शेतकऱ्यांनी छेडलेल्या आंदोलनावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारला सावधगिरीचा इशारा दिला आहे. देशातील प्रत्येक माणूस आंदोलन कर्त्या शेतकऱ्यांच्या मागे उभा राहील असेही ते म्हणाले
मोदी सरकारनं केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणासह देशाच्या इतर भागातील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडलं आहे. मागील आठ दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर हजारोंच्या संख्येनं शेतकऱ्यांचे जत्थे दाखल होत आहेत. तर दुसरीकडे चर्चेच्या पाचव्या फेरीनंतरही सरकारला शेतकऱ्यांचं समाधान करण्यात अपयश आलं आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर जाऊन अभिवादन केलं. त्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली.
या कार्यक्रमानंतर शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी उपस्थित करण्यात आलेल्या शेतकरी आंदोलनाच्या मुद्यावर त्यांनी चिंता व्यक्त केली. पवार म्हणाले,”आपण संपूर्ण देशाची शेती आणि अन्न पुरवठा बघितला, तर सगळ्यात जास्त योगदान त्यात पंजाब व हरयाणातील शेतकऱ्यांचं आहे. विशेषतः गहू आणि तांदूळ यांच्या उत्पादनात देशाची गरज या शेतकऱ्यांनी भागवली. पण त्याचबरोबर जगातील १७-१८ देशांना धान्य पुरवण्याचं काम भारत करतो. त्यात पंजाब आणि हरयाणाचा वाटा फार मोठा आहे. ज्यावेळी पंजाब व हरयाणातील शेतकरी रस्त्यावर येतो, त्याची फार गांभीर्यानं दखल घ्यायला पाहिजे होती. पण, दुर्दैवानं ती घेतलेली दिसत नाही. मला स्वतःला असं वाटतं की, हे असंच जर राहिलं, तर ते दिल्लीपुरतं सीमित राहणार नाही. देशाच्या कानाकोपऱ्यातील लोक या शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहतील आणि प्रश्नांची सोडवणूक आपल्या पद्धतीने करून घेतील . अजूनही शहाणपणाची भूमिका घ्यावी, अशीच माझी अपेक्षा आहे,”असा सल्लाही पवार यांनी मोदी सरकारला दिला आहे.