पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचे ८ टप्पे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । पश्चिम बंगाल विधानसभेची निवडणूक आठ टप्प्यात होणार आहे. पहिला टप्प्यातील मतदान – २७ मार्च, दुसरा – १ एप्रिल, तिसरा – ६ एप्रिल, चौथा – १० एप्रिल, पाचवा १७ एप्रिल, सहावा – २२ एप्रिल, सातवा – २६ एप्रिल व आठवा टप्प्यातील मतदान २९ एप्रिल रोजी होणार आहे.

आगामी काळात होणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहीर करण्यात आल्या. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून पत्रकारपरिषद घेऊन घोषणा करण्यात आली. पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम या चार राज्यांसह पुद्दुचेरी या केंद्रशासीत प्रदेशाची विधानसभा निवडणूक होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी पत्रकारपरिषेदत निडवणुकीच्या तारखांची घोषणा केली. त्यानुसार २७ मार्च ते २९ एप्रिल पर्यंत मतदान होणार असून,सर्व राज्यांमधील निवडणुकांचा निकाल २ मे रोजी जाहीर होणार आहे. पाच राज्यांमधील विधानसभेच्या ८२४ जागांवर मतदान होणार आहे.

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूक भाजपा व तृणमूल काँग्रेसकडून प्रतिष्ठेची करण्यात आल्याचे दिसत आहे. आतापर्यंत राज्यातील सभा व अन्य कार्यक्रमांमधून या दोन्ही पक्षांमधील नेत्यांकडून एकमेकांवर जोरदार टीका करण्यात आलेली आहे. अनेकदा नेत्यांवर हल्ल्याच्या घटना देखील घडलेल्या आहेत. त्यामुळे ही निवडणूक अधिकच रंगतदार होणार असल्याचं दिसत आहे.

देशभरात एकीकडे कोरोनाचा संसर्ग वाढत असताना, दुसरीकडे या विधानसभा निवडणुका होत आहेत. आसामध्ये भाजपाचे सरकार आहे. पुद्दुचेरीत मागील आठवड्यातच काँग्रेसचे सरकार कोसळल्याने तिथं राष्ट्रपती शासन लागू करण्यात आलेलं आहे.

पाच राज्यात विधानसभेच्या ८२४ जागांवर मतदान होणार आहे. पाच राज्यात २.७ लाख मतदान केंद्रावर मतदान होत असून, १८.६ कोटी मतदार आहेत. या सर्व राज्यांध्ये मतदान केंद्रांची संख्या वाढवण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Protected Content