व्यायाम करा आणि रेल्वेचे तिकिट मिळवा मोफत ! ( व्हिडीओ )

piyush goyal

नवी दिल्ली वृत्तसंस्था । आता रेल्वे स्थानकावर प्रशासनातर्फे व्यायाम करण्याचे मशीन लावले जाणार असून यावर व्यायाम करणार्‍यांना प्लॅटफॉर्म तिकिट मोफत देण्यात येणार आहे. रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी आज याबाबत घोषणा केली.

रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी एका ट्विटमधून रेल्वेच्या नवीन उपक्रमाची माहिती दिली. यात रेल्वे स्थानकांवर लवकरच एक्सरसाईज मशिन्स लावण्यात येणार आहेत. या मशिनवर नागरिकांनी येऊन व्यायाम करणे अपेक्षित आहे. यावर व्यायाम केल्यानंतर संबंधीत व्यक्तीला रेल्वेचे प्लॅटफॉर्म तिकिट मोफत दिले जाणार आहे. दिल्लीच्या आनंद विहार रेल्वे स्थानकावर ही मशीन प्रयोगात्मक अवस्थेत लावण्यात आली असून लवकरच देशभरातील अन्य रेल्वे स्थानकांवर याला ठेवण्यात येणार असल्याची माहिती पियुष गोयल यांनी दिली आहे. यामुळे नागरिकांमध्ये व्यायामाविषयक जनजागृती होणार असल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, यासोबत गोव्यातील पणजी रेल्वे स्थानकावर प्रवाशांना सुरक्षेच्या सुचना देण्यासाठी रेल्वे सुरक्षा बल अर्थात आरपीएफ जवानांना सेगवे हे अत्यंत आटोपशीर आकाराचे वाहन प्रदान करण्यात आल्याची माहितीदेखील पियुष गोयल यांनी दिली आहे.

खालील ट्विटमधील व्हिडीओत रेल्वेची ही अफलातून प्रणाली दर्शविण्यात आली आहे.

Protected Content