जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तरुण पिढी व्यसने करण्याचे प्रमाण वाढत आहे. अल्पवयीन मुलांपासून ते तरुण लोकांपर्यंत तंबाखू खाणे, बिडी ओढणे, गुटखा खाणे यासारखे विविध नशा करत आहे. त्यामुळे तोंडाचा कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. यापेक्षा व्यायाम करा, चांगले आहार घ्या. शरीर तंदुरुस्त ठेवा. तरुणांनी वाईट गोष्टींपासून लांब राहा. आपण आरोग्य जागराची ७ मिशन राज्यात सुरु केले आहे. आता मिशन थॉयरॉईड सुरु आहे. थॉयरॉईडची तपासणी वेळोवेळी केली पाहिजे. अनेकांना हा आजार झाल्याचे कळतहि नाही. वेळेवर निदान झाले पाहिजे. असे झाल्यास आपण आजारावर मात करू शकतो, रुग्ण वाचू शकतो, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये खात्याचे मंत्री ना. गिरीश महाजन यांनी केले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे थॉयरॉईड जनजागृती व उपचार अभियानाचे राज्यस्तरीय उदघाटन ना. गिरीश महाजन यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. प्रसंगी वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले, शहराचे आ. राजूमामा भोळे, अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, मिशन थॉयरॉईड अभियानाचे नोडल अधिकारी डॉ. पारोजी बाचेवार उपस्थित मंचावर उपस्थित होते.
सुरुवातील रुग्णालयातील थॉयरॉईड ओपीडीचे मंत्री ना. गिरीश महाजन यांचे हस्ते फित कापून उदघाटन करण्यात आले. यावेळी ओपीडी कक्षाची पाहणी करून ना. महाजन यांनी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे कौतुक केले. यानंतर जाहीर कार्यक्रमात राज्यस्तरीय थॉयरॉईड जनजागृती व उपचार अभियानाचे उदघाटन ना. महाजन यांनी केले. सुरुवातीला मान्यवरांनी दीपप्रज्वलन करून देवी धन्वंतरीच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. त्यांनतर डॉ. अजय चंदनवाले यांनी अभियान कसे राहील, त्याचे स्वरूप सांगितले. अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी रुग्णालयातील थॉयरॉईड ओपीडीविषयी माहिती दिली.
प्रसंगी अभियानाचे फलक हातात घेऊन मान्यवरांनी उदघाटन केले. ना. गिरीश महाजन म्हणाले की, वाढत्या नागरीकरणात जीवनशैली बदलत आहे. शरीराच्या तक्रारी वाढतच आहे. त्यासाठी विविध तपासण्या करणे तसेच लवकर निदान, लवकर उपचार होणे महत्वाचे आहे. त्यामुळे रुग्णाचा जीव वाचू शकतो. वैद्यकीय क्षेत्रात रुग्णसेवेचे अमूल्य कार्य डॉक्टर्स करीत असून वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनीहि अपडेट राहिले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
सूत्रसंचालन डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी केले. आभार डॉ. मारोती पोटे यांनी मानले. कार्यक्रमासाठी सर्व विभागप्रमुख, डॉक्टर्स, अधिकारी, परिचारिका, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.