कांदे मोफत वाटून शेतकर्‍यांचे आंदोलन

जळगाव प्रतिनिधी । कांद्याला भाव नसतांनाच सरकारने शेतकर्‍यांची अडवणूक करण्याचे धोरण अंमलात आणल्याचा निषेध म्हणून आज शहरात मोफत कांदे वाटून शेतकर्‍यांनी अनोखे आंदोलन केले.

कांद्याला भाव नसल्यामुळे शेतकरी अक्षरश: त्रस्त झाले आहेत. अलीकडेच कांदा उत्पादकांनी आत्महत्या केल्याच्या घटनादेखील घडल्या आहेत. या पार्श्‍वभूमिवर, आज सरकारचा निषेध करण्यासाठी जिल्ह्यातील कांदा उत्पादकांनी मोफत कांदा वाटप आंदोलन केले. यात रवी देशमुख, बापू माळी, उखा माळी, सुपडू माळी, बापू मराठे, सुभाष माळी, गोपाळ माळी, वसंत वाघ, पंकज वाणी, अमित वाणी, प्रशांत वाणी, रविंद्र वाणी आदींसह अन्य शेतकर्‍यांनी भाग घेतला. या शेतकर्‍यांनी नागरिकांना एक ट्रॅक्टर भरून कांदा मोफत वाटला.

याप्रसंगी प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदनदेखील देण्यात आले. यामध्ये कांदा उत्पादकांना हेक्टरी ५० हजार रूपये आर्थिक मदत मिळावी, कांद्याला अनुदान रक्कम वाढवून मिळावी, नदीजोड प्रकल्प ताबडतोब राबवावा. कडधान्य, फळ पिके आणि कापूस यांना योग्य भाव द्यावा, कांद्याचा उत्पादन खर्च निघेल इतपत भाव घोषित करावा या मागण्यांचा समावेश आहे.

Add Comment

Protected Content