वेळेत चाचणी करून उपचाराला सामोरे गेल्यास मृत्यूदर कमी करता येईल : केंद्रीय सहसचिव कुणाल कुमार

जळगाव (प्रतिनिधी) कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोनाची प्राथमिक लखणे दिसताच  स्वत: कोविड हॉस्पिटलमध्ये जावून कोरोनाची चाचणी करून घेवून तात्काळ इलाज करून घेतल्यास मृत्यूदर नक्कीच कमी होवू शकेल. असा विश्वास व्यक्त करतानाच आरोग्य प्रशासनाने चाचण्यांची संख्या वाढविण्यावर भर देण्याच्या सूचना केंद्रीय सहसचिव कुणाल कुमार यांनी केल्या.

 

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यास नियुक्त जिल्हास्तरीय बैठक श्री. कुणालकुमार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी समिती सदस्य डॉ. अरविंद कुशवाह, डॉ. सितीकांता बॅनर्जी, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, पोलीस अधिक्षक डॉ.पंजाबराव उगले, महानगर पालिकेचे आयुक्त सतिष कुलकर्णी, जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष  गोरक्ष गाडीलकर, अपर जिल्हाधिकारी प्रविण महाजन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ..एन.एस.चव्हाण, निवासी उप जिल्हाधिकारी राहूल पाटील, उप जिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे आदि अधिकारी उपस्थित होते.

प्रारंभी कुणाल कुमार यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या उपाययोजना आणि येत असलेल्या अडचणी तसेच रुग्णवाहिका व्यवस्थापन, खाटांची उपलब्धता, प्रतिबंधित क्षेत्रातील उपाययोजना, मनुष्यबळ व निधीबाबतची  माहिती जाणून घेतली. ते म्हणाले की, कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी लोकांच्या मनातील या आजाराविषयीची भिती दूर करणे आवश्यक आहे. यासाठी जनजनगृती करण्याबरोबरच संवाद आणि समन्वय आवश्यक आहे. एखादा व्यक्ती तपासणीत पॉझीटिव्ह आढळून आल्यास त्याला तात्काळ उपचार मिळणेही तितकेच महत्वाचे आहे. यासाठी व्यवस्थापन पध्दत सतत अद्यावत ठेवणे आवश्यक आहे. प्रतिबंधित क्षेत्राकडे विशेष लक्ष देऊन तेथील रुग्णसंख्या कमी करण्याबरोबरच त्या क्षेत्रातील नागरिकांच्या मुलभूत गरजांकडेही लक्ष देण्याची आवश्यकता आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी व ती कायम नियंत्रणात राहण्यासाठी विशेष दक्षता घेण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी संबंधितांना दिल्यात. कोरोना विरुध्दच्या या लढाईत सर्व अधिकारी व कर्मचा-यांनी समन्वयाने काम करावे असेही त्यांनी सूचित केले.

प्रारंभी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जिल्ह्यातील कोरोनाबाबतची एकंदरीत स्थिती व त्याअनुषंगाने करण्यात आलेल्या उपाययोजना व त्यातून मिळालेले यश याची सविस्तरपणे माहिती सादर केली. महापालिका प्रशासनाकडून राबविण्यात येत असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती व मिळालेले यश महानगर पालिकेचे आयुक्त सतीष कुलकर्णी यांनी ग्राफिकच्या माध्यमातून सादर केली. केंद्रीय सहसचिव कुणाल कुमार यांनी जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेकडून कारोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांवर समाधान व्यक्त करून अजून अधिक जोमाने व समन्वयाने काम करण्याच्या अपेक्षा व्यक्त केली.

 

प्रतिबंधित क्षेत्रास भेटी

केंद्रिय पथकाने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने आयोजित जिल्हास्तरीय आढावा बैठकीपूर्वी शहरातील कार्तीक नगर, शिवाजी नगर येथील प्रतिबंधात्मक क्षेत्रांची पाहणी केली.तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड हॉस्पिटलला भेट दिली व  तेथील रुग्णांची पाहणी करून व औषधोपचाराची माहिती जाणून केली. पाहणीनंतर पथकाने जिल्हा प्रशासनाकडून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या उपाययोनांबाबत संबंधित यंत्रणांना सुचना केल्यात.

Protected Content