मुंबई : वृत्तसंस्था । वीज बिल माफीबाबत सरकार गंभीर आहे. वीज ग्राहकांची सेवा हाच आमचा धर्म आहे. वीज ग्राहक हा आमचा देव आहे आम्ही त्या ग्राहकाचे नुकसान आम्ही करणार नाही असं उर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हटलं आहे. पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पायाभूत सुविधेला बळकटी देण्याचे काम सुरु आहे. वीज थकबाकीची देणी गेल्या सरकारने आमच्या माथी मारली आहेत. जीएसटीचे पैसे अद्याप केंद्राने दिलेले नाहीत. १०० युनिट वीज बिल माफीबाबत गट तयार करण्यात आला आहे अशीही माहिती नितीन राऊत यांनी दिली.
दरम्यान वाढीव वीज बिलांच्या मुद्यावरुन भाजपाने मंत्रालयात शिरुन आंदोलन करु असा इशारा दिला आहे. केंद्राला मी वारंवार पत्र लिहून १० हजार कोटींच्या अनुदानाचीही मागणी केली आहे. मात्र केंद्र सरकारने यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे भाजपाला आंदोलन करायचंच असेल तर त्यांनी केंद्राविरोधात करावं असाही टोला नितीन राऊत यांनी लगावला.
केंद्र सरकारने राज्याचे जीएसटीचे २८ हजार कोटी रुपये दिले तर वाढीव वीज बिलांमध्ये माफी देता येईल असंही ते म्हणाले. भाजपा नेत्यांनी वाढीव वीज बिलं घेऊन माझ्या कार्यालयात यावं मी सर्वांची तपासणी करुन देईन. वाढीव वीज बिलं नसतील तर त्यांनी प्रॉमिस करावं आम्ही सर्व वीज बिलं भरु असं आव्हानच उर्जामंत्र्यांनी भाजपाला दिलं आहे.
फडणवीस सरकारने थकबाकीचा डोंगर उभा केला आहे. त्यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे होते. थकबाकीसाठी व्याज आणि दंड माफ करुन थकबाकी भरण्याची सवलत देण्यात येईल असंही त्यांनी म्हटलं आहे. मार्च २०१४ पर्यंत महावितरणची थकबाकी ही १४१५४ कोटी इतकी होती. ही थकबाकी आता ५९१४८ कोटींपर्यंत गेली आहे असंही नितीन राऊत यांनी सांगितलं आहे.