वीज बिलाबाबत ग्राहकांचे निरसन करणार- कार्यकारी अभियंत्यांची ग्वाही

जामनेर प्रतिनिधी । ग्राहकांना एकत्रीतपणे वीज बिल देण्यात आल्याने त्यांना संभ्रम वाटत असून याबाबत काही अडचण असल्याच आमच्या खात्यातर्फे याचे निरसन करण्यात येणार असल्याची ग्वाही वीज वितरण कंपनीच्या भुसावळ विभागाचे कार्यकारी अभियंता पी. आर. बोरूडे यांनी दिली. ते आज येथे बोलत होते.

याबाबत वृत्त असे की, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सगळीच कामे व दैनंदिन व्यवहारात अनियमितता आली असुन त्यात अत्यावश्यक सेवा म्हणून विज कंपनीतील बिल विभागाचे नियोजनही काहिसे कोलमडले होते. पण आता विज वितरण कंपनी कडून विज बिल भरणा करण्यासाठी.बिल वाटपाची सुरुवात झाली असुन ग्राहकांनी नियमित विज बिल भरणा करावा याचे आवाहन भुसावळ विभागाचे कार्यकारी अभियंता पी.आर.बोरूडे यांनी जामनेर येथे भेट दिली असता केले आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे भगवान पाटील, विलास राजपुत्र, किशोर पाटील व प्रल्हाद बोरसे,यांनी तालुक्यातील विज बिल ग्राहक व नागरिकांच्या समस्या बोरूडे यांच्या समोर मांडल्या. यावेळी लॉकडाऊनच्या काळात विजबिल वाटप बंद होती. त्यामुळे आता कंपनी कडून सुरू असलेली बिल वाटप व त्यातील रकमेचे आकडे पाहून सर्व सामान्य ग्राहकांच्या मनात प्रश्‍न उभा राहत आहे की यात सरसकट तीन महिन्यांचे रिडींग दिसत आहे. त्यामुळे सरासरी एक महिन्याच्या रिडींग प्रमाणे बिल न येता तिन महिन्यांचे एकत्रित रिडींग बिल आले असुन त्यामुळेच बिलांची अवास्तव रक्कम वाढली असल्याचा संभ्रम ग्राहकांंमध्ये दिसून येत आहे. त्यावर बोरूडे यांनी विजबिल रिडींग प्रत्येक महिन्याच्या युनिट प्रमाणेच विभागणी केली असुन त्या त्या महिन्याच्या विज वापरानुसार रक्कम आकारली असल्याचे स्पष्ट केले. ग्राहकांना बिला संदर्भात काही अडचण असल्यास विज वितरण कंपनीकडे तक्रार करावी निरसन केले जाईल असे ते म्हणाले. यावेळी जामनेर विज वितरण कंपनीचे उपविभागीय कार्यकारी अभियंता विजय करेरा, डी.एम.बाविस्कर, रितेश महाजन हे उपस्थित होते.

Protected Content