जळगाव प्रतिनिधी । एरंडोल तालुक्यातील आडगाव येथील रविंद्र प्रभाकर महाजन (वय 22) व महेंद्र उखर्डू पाटील (वय 23) या तरुणांचे अंगावर वीज पडल्याने शनिवारी दुर्दैवी निधन झाले. मृत झालेल्या दोन्ही तरुणांच्या कुटूंबियांची आज राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील आणि आमदार चिमणराव पाटील यांनी घरी जाऊन भेट घेतली व कुटूंबियांचे सात्वंन केले.
दोन्ही तरुण मुलांचा मृत्यू ही दुर्दैवी घटना असून शासन कुटूंबियांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहील अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी या कुटूंबाला दिली. तसेच या दोन्ही तरुणांच्या कुटूंबियांना शासनामार्फत मिळणारी तातडीची मदत लवकरात लवकर उपलब्ध करुन देण्याचे निर्देश पालकमंत्री यांनी प्रशासकीय यंत्रणेला दिलेत. यावेळी पंचायत समिती सभापती अनिलभाऊ महाजन, प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसीलदार अर्चना खेतमळीस, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष हिम्मतराव पाटील, जगदीश पाटील, महानंदा पाटील, वासुदेव पाटील आदि उपस्थित होते.