विषारी औषध पाजून पतीला ठार मारण्याचा प्रयत्न; पत्नीसह तिघांवर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । शहरात हरिविठ्ठल नगरात मुलाबाळांसह विभक्त राहत असलेल्या पत्नीच्या भेटीसाठी आलेल्या पती संतोष नारायण कुमावत वय 38 रा. पहूर पाळधी ता.जामनेर यांना पत्नीसह चौघांनी पाण्यात काहीतरी औषध टाकून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना 28 रोजी 3.15 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पत्नी पतीच्या फिर्यादीवरुन दिपालीसह, शालक, शालकाची पत्नी व एक जण अशा चौघांविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुलाची भेट घेण्यासाठी आले होते
जामनेर तालुक्यातील पहूर पाळधी येथे संतोष कुमावत हे एकटे राहतात. 2017 पासून त्यांची पत्नी दिपाली व 9 वर्षांचा मुलगा हिंमाशू हे हरिविठ्ठल नगरात सागर टेन्ट हाऊसजवळ भाड्याची खोली करुन राहतात. 28 रोजी दुपारी 3.15 वाजेच्या सुमारास संतोष कुमावत हे मुलाची भेट घेण्यासाठी गावावरुन जळगाव हरिविठ्ठल नगर येथे आले. यावेळी पत्नीसोबत तिच्या घरात शालक सदानंद रामलाल कुमावत, त्याची पत्नी वैशाली, पत्नीच्या ओळखीतील एक व्यक्ती असे चौघे जण हजर होते. संतोष कुमावत हे घराबाहेरील ब्युटीपार्लर दुकानात बसून मुलाची वाट पहात होते. काही वेळाने मुलगा आला.

पाणी पिताच चक्कर येवून कोसळले
त्याची भेट घेत असतांना पत्नी दिपालीने कुमावत यांना पिण्यासाठी पाणी आणले. पाण्याची वेगळीच कडवट अशी लागत असल्याने कुमावत यांनी पत्नीला विचारणा केली. दिपालीने महापालिकेने पाण्यात टीसीलएल पावडर टाकलेली असल्यामुळे ते तुम्हाला कडवट लागत असल्याचे उत्तर दिले. यानंतर काही वेळाने संतोष कुमावत यांना मळमळ तसेच चक्कर यायला लागले. याचवेळी ते चक्कर येवून ते घराच्या बाहेर पडले. रस्त्याने जाणार्‍या एकाने संतोष खाली पडल्याचे पाहून रिक्षातून कुमावत यांना जिल्हा रुग्णालयात हलविले. रिक्षाचालक यानंतर निघून गेला. संतोष कुमावत यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदविला आहे. पिण्यासाठी दिलेल्या पाण्यात काहीतरी टाकून त्यानुसार पत्नी दिपाली, शालक सदानंद रामालाल कुमावत, वैशाली रामलाल कुमावत तिघे रा. हरिविठ्ठल नगर व अनोळखी एक व्यक्ती या चौघांनी जीवे ठार मारुन टाकण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार कुमावत यांनी केली असून त्यावरुन चौघांविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलीस उपनिरिक्षक सुहास राऊत करीत आहेत.

Protected Content